जामखेड न्युज – – – – –
जामखेड नगरपरिषदेच्या वतीने मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिम
नालेसफाई, कचरा व्यवस्थापन व वृक्षलागवडीचा संदेश – नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जामखेड नगरपरिषदेच्या वतीने जनजागृती करत मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात तसेच नगरसेविका सीमाताई कुलकर्णी यांनी प्रभाग क्रमांक ३ मध्ये नालेसफाई व स्वच्छतेच्या कामांची पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी म्हणाल्या की, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती आणि मान्सूनपूर्व तयारीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

शहरातील सर्व प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबविण्यात येणार असून, ज्या ठिकाणी नाल्यांमध्ये पाणी साचण्याची समस्या आहे तेथे स्वच्छता व दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी छत्रपती संभाजी महाराज मार्गावरील दुभाजक भिंतींवर रंगरंगोटी करून विविध संदेशात्मक चित्रे साकारण्यात आली आहेत.

तसेच महिलांनी घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करून तो घंटागाडीत टाकावा, रस्त्यावर कचरा फेकू नये, असे आवाहनही त्यांनी केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून स्वच्छतेत सहभाग घ्यावा, असेही त्या म्हणाल्या.



