सागर मोहळकर वरील गोळीबार प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जामखेड गोळीबारातील आरोपींना लवकरच अटक करणार – प्रविणचंद लोखंडे
जामखेड शहरातील न्युरानी काँलनी येथे काल बुधवार दि. ४ रोजी सायंकाळी सात साडेसात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती यात कुख्यात गुंड सागर मोहळकर गंभीर जखमी झाला होता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत योग्य त्या सूचना दिल्या होत्या.
गोळीबाराच्या घटनेनंतर आज सागर मोहळकर चे वडील किसन चांगदेव मोहळकर वय ६२ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जामखेड पोलीस स्टेशनलाअज्ञाताविरोधात कलम 109 (1 ) शस्त्र अधिनियन 1959 चे कलम 3 /25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मध्ये म्हटले आहे की, सागर मोहळकर यास कोणीतरी अज्ञात इसमांनी (नाव व पत्ता माहित नाही) मोटरसायकलवर येऊन अज्ञात कारणासाठी, जिवे ठार मारण्याचे उद्देशाने बंदुकीने गोळीबार करुन त्यास गंभीर जखमी केले आहे, वगैरे मजकुराचे फिर्यादी वरुन गुन्हा रजि दाखल करण्यात आली आहे.
चौकट
जामखेड गोळीबारातील आरोपींना लवकरच अटक करणार – प्रविणचंद लोखंडे
बुधवार दि. ४ मार्च रोजी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास सागर मोहळकर यांच्या वर गोळीबार करण्यात आला होता. यात तो गंभीर जखमी झालेला होता. या घटनास्थळी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी भेट देत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश दिले त्या अनुषंगाने कर्जत जामखेड चे उपविभागीय अधिकारी प्रविणचंद लोखंडे तळ ठोकून असून अनेकांची चौकशी करत आहेत.
या संदर्भात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आरोपींना अटक करण्यासाठी चार पथके नेमलेली असून तपास योग्य दिशेने सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. जखमी सागर मोहळकर वर सध्या पुणे येथील ससून हाँस्पिटल येथे उपचार सुरू असून शस्त्रक्रिया झाली आहे. तब्येत स्थीर असल्याचे सांगितले.
चौकट
“माझ्या मतदारसंघात जामखेडमध्ये गेल्या काही काळापासून गुन्हेगारी वेगाने फोफावत आहे. गुन्हेगारांकडून गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे सामान्य माणसांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यासंदर्भात अनेकदा आवाज उठवला तरी या घटनांना आळा घालण्यास पोलीस प्रशासनाला यश आलेलं नाही”, असं रोहित पवार ट्विटमध्ये म्हणाले आहे.
जामखेड येथे राजरोस पणे गोळीबाराच्या घटना घडत आहेत गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. दुसरीकडे जामखेड च्या ज्वलंत अतिक्रमण प्रश्नांसाठी सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांचे साखळी उपोषण सुरू आहे. कर्जत जामखेड ला दोन आमदार असून राज्यात दबदबा आहे मात्र मतदारसंघाचे काहीच देणे घेणे नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असून जामखेड नगरीत चाललयं काय? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.