भाजपाच्या ऐतिहासिक विजयाचा होणार जल्लोष, सभापती प्रा राम शिंदे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष व नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली लढवण्यात आलेल्या जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजपने दैदीप्यमान आणि ऐतिहासिक विजय मिळवत नगरपरिषदेवर निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर शुक्रवारी (२६ डिसेंबर रोजी) भाजपच्या वतीने विजयोत्सव साजरा केला जाणार आहे.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या विजयोत्सवात नगराध्यक्षासह नवनिर्वाचित १५ नगरसेवकांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात हे असणार आहेत.
जामखेड नगरपरिषदेच्या निवडणूकीत भाजपने रोहित पवारांच्या राजकीय महत्वकांक्षेला सुरुंग लावला. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा दारूण पराभव करत भाजपने नगराध्यक्षासह नगरसेवकपदाच्या १५ जागांवर दिमाखदार विजय मिळवला. जामखेडकरांनी विकास, स्थैर्य आणि अनुभवी नेतृत्वावर विश्वास टाकत भाजपला नगरपरिषदेत स्पष्ट कौल दिला. भाजपच्या उमेदवारांनी बहुतांश प्रभागांमध्ये निर्णायक आघाडी घेत दणदणीत विजय संपादन केला. तर विरोधकांच्या आसुरी महत्वकांक्षेचा पुरता चुराडा झाला. घवघवीत यश संपादन करत भाजपने जामखेडच्या राजकारणात नवा अध्याय लिहीला आहे.
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत प्रा. राम शिंदे यांचे नेतृत्व निर्णायक ठरले. त्यांनी मायक्रो प्लॅनिंग करत निवडणुकीत राबवलेली रणनिती प्रचंड यशस्वी ठरली. शिंदे यांचा प्रत्येक डाव यशस्वी ठरला. टोकाची टीका टिप्पणी, विखारी प्रचार न करता, विकासाच्या मुद्द्यावर शिंदे यांनी जनतेची मने जिंकली. संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांची फळी आणि जनतेशी थेट संवाद या त्रिसूत्रीच्या जोरावर भाजपने ही निवडणूक जिंकली. जामखेडकरांनी भाजपच्या विकासाभिमुख धोरणावर आपला विश्वास अधोरेखित केला.
जामखेड नगरपरिषद निवडणुकीत प्रांजल अमित चिंतामणी यांनी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवड होत इतिहास रचला आहे. त्यांच्या या विजयामुळे जामखेड नगरपरिषदेत नव्या पर्वाला सुरुवात झाली असून महिला नेतृत्वालाही बळ मिळाले आहे. तसेच भाजपचे नव-निवाचित नगरसेवक मोठ्या संख्येने विजयी झाल्याने जामखेड शहरात भाजपची पकड अधिक मजबूत झाली आहे. जामखेड नगरपरिषदेतील भाजपचा हा विजय केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून, भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा आणि नेतृत्वावरील जनतेच्या विश्वासाचा स्पष्ट कौल मानला जात आहे.
या ऐतिहासिक विजयानंतर जामखेड येथे नव-निर्वाचित नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी व भाजपच्या १५ नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे प्रमुख उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रा. मधुकर (आबा) राळेभात भूषवणार आहेत. हा समारंभ भाजपच्या विजयाचा उत्सव आणि संघटनात्मक ताकदीचे प्रदर्शन ठरणार आहे. हा कार्यक्रम जामखेड येथील विठाई मंगल कार्यालयात शुक्रवारी (२६ रोजी) सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी जामखेड शहरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन जामखेड भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.