जामखेड न्युज – – –
मुरबाड-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आंबळे (खुर्द) येथील तरुण शेतकरी देविदास गडगे याने आपल्या शेतामध्ये यंदा पहिल्यांदाच लाल भेंडीची यशस्वी लागवड केली आहे. सध्या देविदास यांना ८० ते १०० रुपये लाल भेंडीस दर मिळत आहे व हिरव्या भेंडीस सुरुवातीला ५५ रुपये व आता २५ रुपये दर मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात येथील शेतकरी वर्ग व तरुण वर्ग मोठ्या कसोटीने विविध भाजीपाल्याची लागवड केली जाते. त्यातूनच मिळणारा उत्पन्नावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे.
परंतु बदलत्या हवामानामुळे यंदा अक्षरश: भाजीपाला पिकाची वाताहत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच दर दिवसाला भाजीपाल्याची भाववाढ चढ-उतार होत असते. तरीही मुरबाडचा शेतकरीवर्ग मात्र वर्षानुवर्षे भाजीपाल्याचा पीक घेतल्याशिवाय गप्प राहत नाही हे मात्र तेवढेच सत्य आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यात वेगवेगळ्या घेत असलेल्या भाजीपाला पिकात मुरबाडकरांचे नाव असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुरबाडची भेंडी आजही मुंबई एअरपोर्टवरून इंटरनॅशनल मार्केटला जात आहे.
विकेल ते पिकेल योजनेच्या माध्यमातून केला प्रयत्न
कृषी विभागाच्या आत्मा योजनेच्या माध्यमातून शेतीशाळा आंबेळे खुर्द येथे भेंडी पिकावर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच नाविन्यपूर्ण लाल भेंडी पीक प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये लागवड पद्धत, संकरित वाण रोग व कीड प्रतिकारक्षम वाण निवड, जैविक पद्धतीचा वापर दशपर्णी अर्क, जीवामृत – १० मिली प्रति लिटर, ह्युमिक इत्यादी वापर केल्याने चांगले पीक आले आहे.
कृषी विभागाच्या विकेल ते पिकेल योजने माध्यमातून देविदास यांनी लाल भेंडीचे पीक आपल्या शेतामध्ये घेतले आहे. या अनुभवावरून तालुका कृषी अधिकारी नामदेव धांडे यांनी मुरबाड मधील शेतकरी यांना मल्चिंग व ठिबक तंत्रज्ञान व प्रयोगशील राहून नवनवीन प्रयोग करण्यासाठी आवाहन केले आहे. तसेच गोकुळ जाधव व मधुकर कुर्ले यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.




