जामखेड न्युज – – –
दोन वर्षाच्या कालखंडानंतर कोठे आता शाळा सुरू झाल्या आहेत व सध्या परीक्षेचा काळ आहे. कोरोनासारख्या महामारीने मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन आता कुठे तरी मुलांच्या शाळा सुरू झाल्या परंतु एस टी महामंडळाचे कर्मचारी संपावर असल्याने मोठी कसरत करावी लागत आहे. मुलांना स्वतः चा जीव धोक्यात घालून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे चित्र जामखेड तालुक्यात दिसून येत आहे.
जामखेड तालुक्यातील खेडे गावातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येताना प्रवास करत असताना मुलांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना स्टाॅपवर खाजगी वाहन पुर्ण क्षमतेने भरण्यापर्यंत वाट पहावी लागते,
यात मोठा वेळ वाया जातो अभ्यास बुडतो खाजगी वाहनात दाटीवाटीने प्रवास करावा लागणे, गाडीच्या टपावर बसून प्रवास करावा लागणे, बसच्या टिकीटापेक्षा जास्तीचे पैसे द्यावे लागणे अशा एक ना अनेक प्रश्नांना विद्यार्थ्यांना सामोरे जावा लागत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण ?
तसेच खासगी वाहनाने प्रवास करत असताना जर काही अनुचित प्रकार घडल्यास सदर प्रकारास जबाबदार कोण असा प्रश्न समोर येताना दिसत आहे. अशा प्रकारास जबाबदार प्रशासन की एस टी महामंडळ हा पेच निर्माण होण्याअगोदर प्रशासनाने या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा विषय गांभीर्याने घेऊन विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करून एस टी महामंडळाबाबत योग्य तो निर्णय घेऊन सर्व एस टी बस लवकरात लवकर सुरू करून हा संप विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
सध्या परीक्षेचा काळ असल्याने मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहे.