जामखेड न्युज – – –
नवीन हॉटेल व्यवसाय करण्यासाठी सावकाराकडून दहा टक्के व्याज दराने घेतलेले पैसे वर्षभराने व्याजासह परत करूनही सावकाराने व त्याच्या पत्नीने फिर्यादीच्या घरासमोर येऊन फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी करून पावणेतीन गुंठ्याचा प्लॉट सावकाराने नोटरी करून नावावर करून घेतला अशी फिर्याद दाखल झाल्याने पोलिसांनी सावकार पतीपत्नीवर सावकारकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी देवीदास बन्सी शिंदे (रा. आयकॉन सिटी जामखेड) यांनी फिर्याद दिली की, २०१८ मध्ये नवीन हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी संदीप उत्तम शिंदे (रा. खाडेनगर जामखेड) यांच्याकडून १ लाख रुपये कर्ज १० टक्के व्याजदराने घेतले होते. याकरीता मुलाच्या नावाने असलेले महाराष्ट्र बॅंकेचे कोरे चेक दिले होते. व प्रत्येक महिन्याला व्याज रोखीने दिले.
१ जानेवारी २०१९ रोजी संदीप शिंदे यांच्याकडून घेतलेले एक लाख व व्याजाचे पैसे घेण्यासाठी कळवले असता त्याने मुंबईला असल्याचे सांगितले व पत्नी आरती शिंदे यांच्याकडे पैसे द्या असे सांगितले. त्यानुसार पैसे आरती शिंदे यांच्याकडे दिले व तारण चेक परत मागीतले असता मुंबई वरून आल्यावर देऊ असे सांगितले.
दि. ८ मार्च रोजी सावकार संदीप शिंदे व त्याची पत्नी हे फिर्यादी देवीदास शिंदे यांच्या घरी येऊन तुम्ही फक्त मुद्दल दिली आहे तुमची नगररोडवरील पावणेतीन गंठे (२८८७ स्केअर फुट) जागा आमच्या नावावर करा असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली यामुळे फिर्यादी घाबरून जाऊन २८८७ स्केअर फुट जागा सावकार संदीप शिंदे यांच्या नावावर केली. सावकाराचे वेळोवेळी व्याज व मुद्दल रक्कम देऊनही सावकार व त्याच्या पत्नीने शिवीगाळ दमदाटी करून पावणेतीन गुंठे नोटरी करून दिली अशी फिर्याद देवीदास शिंदे यांनी दाखल केल्याने पोलीसांनी सावकारकीचा गुन्हा पतीपत्नीवर दाखल केला.