सरकारचं दोन वर्षाचं काम लई भारी लोककला पथकांचा जागर!!

0
174
जामखेड न्युज – – – 
 ऐका हो , मायबाप नागरिक हो…, “सरकार आलं तुमच्या दारी, सरकारचं दोन वर्षाचं काम लई भारी…” अशा शब्‍दात संबळ, ढोलकी, तुणतुण्याच्या तालावर साद घालतं लोकपथकांनी जागर केला.  पारंपरिक भारूडे, पोवाडा व शाहीरी मधून महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षांची सर्वोंत्तम कामगिरी जनतेपुढं सादर करण्यास आजपासून (9 मार्च) सुरूवात केली.
            लोककला पथकांच्या माध्यमातून योजनांचा प्रचार-प्रसार कार्यक्रमांची सुरूवात अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वासुंदा व शेवगाव तालुक्यातील दहिगांव या गावातून 9 मार्च पासून झाली. वासुंदा गावात मुख्य चौकातील मारूती मंदिरात सरपंच सुमन सैद व ग्रामस्थांच्या उपस्थितीत लोक कला नाट्याला सुरूवात झाली. रसिक कला मंचचे शाहीर कैलास अटक यांच्या पथकाने सादर केलेल्या शाहीरी, लोकनाट्याला येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आबालवृद्ध, ज्येष्ठ नागरिकांनी या लोककला नाट्ये, शाहीरीचा आनंद घेतला. त्यानंतर त्यांनी  टाकळी व ढवळपूरी या गावात कार्यक्रम सादर केला. तर दहिगांव या गावात जयहिंद लोक कला मंचचे राष्ट्रीय भारूडकार हमीद सय्यद यांच्या पथकाने बस स्थानक परिसरात लोकनाट्य सादर केले. सरपंच सुभाष पवार, उपसरपंच सुर्यकांत कुत्ते यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून लोककला नाट्याला सुरूवात झाली. हमीद सय्यद यांच्‍या पथकाने सादर केलेल्या लोकनाट्याचा  ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला. यावेळी  ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त करत शासनाच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. त्यानंतर जयहिंद लोक मंचच्या पथकाने बालमटाकडी, लाड जळगांव येथे कार्यक्रम सादर केला.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अहमदनगर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येत आहे. अहमदनगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व जामखेड या तालुक्यात रसिक कला मंच तसेच राहाता, कोपरगांव, संगमनेर व अकोले या तालुक्यात कलासाध्य प्रतिष्ठान आणि पाथर्डी, शेवगाव, नेवासा, राहूरी व श्रीरामपूर या तालुक्यात जयहिंद लोक कला मंचचे कलाकार जागृती करणार आहेत.
            महाविकास आघाडी शासनाला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली असून त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये लोककलेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम सुरू झाली आहे.
            “दोन वर्ष जनसेवेची, ‘महाविकास’ आघाडीची” या घोषवाक्यासह जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात व्यापक जनजागृती केली जाणार आहे.  प्रबोधनाच्‍या माध्‍यमातून या मोहीमत 17 मार्च 2022 पर्यंत 63 गावांमध्ये  कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे. यात जिल्हा मुख्यालयाचे गर्दीचे ठिकाण, तालुका मुख्यालयाचे गर्दीचे ठिकाण, कृषी उत्पन्न बाजार समित्या, गाव जत्रा, आठवडे बाजार, उप जिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे, रेल्वे स्थानकांच्या बाहेरचा परिसर या सर्व ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत.
            नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here