जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून कर्जत जामखेडमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी दातांची समस्या असलेले अनेक रुग्ण या शिबिरात आढळून आले होते. मतदारसंघातील दातांची समस्या असलेल्या नागरिकांवर पुढील उपचार व्हावे या उद्देशाने आमदार रोहित दादा पवार यांनी पुण्यातील डी. वाय पाटील रुग्णालयाशी संपर्क करून त्यांना मतदारसंघात तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करून घेण्यासाठी विनंती केली होती.
आमदार रोहित पवार यांच्या विनंतीनुसार डी वाय पाटील रुग्णालय पिंपरी येथील डॉक्टर स्मिता जाधव यांची 19 लोकांची टीम जामखेड येथे पाठवण्यात आली होती. तसेच यावेळी दातांच्या विविध समस्या असलेल्या रुग्णांवर 5 व 6 मार्च असे दोन दिवस मोफत उपचार करण्यात आले. हे दोन दिवसीय शिबीर आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व आरोळे हॉस्पिटल जामखेड यांच्या सहकार्याने व डी वाय पाटील रुग्णालय पिंपरी यांच्या माध्यमातून पार पडले. संबंधित दंत चिकित्सा शिबिराचा लाभ जवळपास 300 रुग्णांनी घेतला आहे. तसेच अशा प्रकारची आरोग्य शिबिरे मतदारसंघात आयोजित झाल्यामुळे व तज्ज्ञ डॉक्टरांकडून मतदारसंघातच उपचार मिळत असल्याने नागरिकही समाधान व्यक्त करत आहेत. आमदार रोहित पवारांनीही मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी सतत झटत राहणार असे बोलून दाखवले त्याचबरोबर जामखेड येथे डॉक्टरांची टीम पाठवल्याबद्दल डी. वाय पाटील रुग्णालयाचे त्यांनी आभारही व्यक्त केले आहे.





