धक्कादायक! सामूहिक बलात्काराच्या घटनेने नागपुरात खळबळ

0
240
जामखेड न्युज – – – – 
सध्या देशात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. अत्याचाराच्या अनेक घटना सध्या समोर येत आहेत. अशातच, नागपुरातून एक बलात्काराची घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे.
पिडीत मुलगी ही अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. या तरुणीची काही दिवसांपूर्वी फेसबूकवरून एका तरुणाशी ओळख झाली. दोन फेब्रुवारी रोजी कॅम्पस चौकातून या फेसबुकवरील मित्राने पीडितेला आपल्या दुचाकीवर बसवले. त्यानंतर जाफरनगर ले-आऊट भागातील एका फ्लॅटमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला.विशेष बाब म्हणजे बलात्कार करण्यापूर्वी पीडितेला गुंगीचे औषध देण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, या मित्रानंतर त्याचा आणखी एक मित्र आला. त्यानंतर चार-पाच जण तिथं आले. त्यांनी तिच्यावर सामूहिकरित्या अत्याचार केले. सदर घटनेने पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. या नराधमांनी पीडितेला धमकी देत सीताबर्डी भागात सोडून दिले. धक्कादायक म्हणजे दुसर्‍या दिवशीसुद्धा तिला जाफरनगर भागात घेऊन जाऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. अत्याचार करण्यापूर्वी आरोपींनी दारूची पार्टी केल्याची माहिती आहे. तिच्यावर दुसर्‍यांदा सामूहिक अत्याचार झाल्यानंतर ती घरी गेली.
दरम्यान, पीडितेने पोटात दुखत असल्याची तक्रार केल्याने कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. तपासानंतर तिच्यावर बळजबरी करण्यात आल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. हे ऐकून कुटुंबियांना मोठा धक्का बसला. यानंतर पीडितेने गुरुवारी सायंकाळी अंबाझरी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी देखील तात्काळ गुन्हा दाखल केला. सामूहिक अत्याचाराची माहिती मिळताच डीसीपी विनिता साहू यांनीदेखील पीडितेकडून घटनेची माहिती घेतली. तिने दिलेल्या माहितीनुसार, दोन मुले जाफरनगर तर दोन मुले बजेरिया येथील रहिवासी आहेत. पुढील तपास गुन्हे शाखा आणि पोलिसांचा डीबी स्वॅड करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here