जामखेड न्युज – – – – –
कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. महाराष्ट्राच्या विविध भागातून अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगत अनेक विद्यार्थी दिल्ली गाठतात. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारच्या बार्टी, सारथी तसेच महाज्योती या संस्थांची मोठ्या प्रमाणात मदत होत असते.
संबंधित संस्थांच्या कारभाराबाबत आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांना विविध सूचनाही केल्या. तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी तात्काळ प्रयत्नही केले. याशिवाय केंद्रातील विविध स्पर्धा परीक्षा संदर्भात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातच मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची योजना विचाराधीन असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
तसेच या योजनेत यूपीएससीचा समावेश केला तर विद्यार्थ्यांचा अतिरिक्त होणारा खर्चही वाचेल. मराठी विद्यार्थ्यांशी दिल्लीत मुक्तसंवाद साधून आणि त्यांच्याशी बोलून अत्यंत सकारात्मक ऊर्जा मिळाली अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.