जामखेड न्युज – – – –
मुलींची छेड काढणाऱ्यास मज्जाव केल्याने मुख्याध्यापकांसह अधीक्षकांवरही तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे. या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कन्नड शहरातील मकरणपूर येथे ही घटना घडली. या घटनेमुळे वातावरण तणावग्रस्त बनले आहे. कन्नड कारखाना परिसरात जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालय आहे. येथे दहावीपर्यंतचे वर्ग भरतात.
मजिद जमील शेख (२४, रा. मकरणपूर) हा मागील अनेक दिवसांपासून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकीवर फिरत मुलींची छेड काढत होता. मुख्याध्यापक ए. पी. चव्हाण यांनी अनेकदा त्याला समजावून सांगितले होते.
त्यानंतरही हा प्रकार थांबला नाही. अखेर चव्हाण यांनी त्याला परिसरात येण्यास मज्जाव केला. मात्र शुक्रवारी शाळा सुटण्याच्या सुमारास मजिद शाळेच्या गेटसमोर गेला. मुख्याध्यापक चव्हाण यांना दमदाटी करत होता.
स्कूल के सामने चक्कर मारते हुए मेरे फोटो निकालकर मेरे बाप को मोबाइल पर भेजता है क्या… असे म्हणत मुख्याध्यापक व अधीक्षक संतोष जाधव यांच्याशी वाद घालून शिवीगाळ सुरू केली व पाहून घेतो, अशी धमकीही दिली.
हा प्रकार घडल्यानंतर मुख्याध्यापक चव्हाण व अधीक्षक जाधव हे मजिदच्या वडिलांना सांगण्यासाठी मकरणपूर येथे जात होते. त्याच वेळी मजिदने त्यांना रस्त्यातच गाठले व तलावारीने अधीक्षक संतोष यांच्या डाव्या खांद्यावर वार, तर चव्हाण यांच्या उजव्या खांद्यावर व कानावर सपासप वार केले.
या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. घटनेची माहिती शहर पोलिसांना कळताच सहायक पोलिस निरीक्षक दिनेश जाधव यांच्यासह पोलिस घटनास्थळी पोहोचले. जखमींना उपचारासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात हलवले आहे. आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणी मुख्याध्यापक ए. पी. चव्हाण यांच्या फिर्यादीवरून मजिद जमील शेख रा. मकरणपूर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.