जामखेड न्युज – – – –
जामखेड महाविद्यालय आणि मराठी साहित्य प्रतिष्ठान जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात आला. यामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले होते. दि. २५ जानेवारी रोजी ‘मराठी भाषा सद्यस्थिती: संवर्धन व उपाय’ या विषयावर डॉ. सुधाकर शेलार यांचे आभासी माध्यमातून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना डॉ. शेलार म्हणाले की, “भाषेच्या संवर्धनाचा आग्रह होतो आहे म्हणजेच भाषेविषयी चिंता निर्माण झाली आहे का? भाषिक प्रश्नांबाबत आपण सर्वच पातळ्यांवर दुटप्पी वर्तन करत आहोत. त्यामुळे दुकानाची पाटी तेव्हढीच मराठी अन् दुकानात माल सारा परदेशी अशी हास्यास्पद अवस्था होते आहे. आभास आणि ढोंग यामुळे भाषा समृद्ध होणार नाही तर त्यासाठी शासकीय धोरणे आणि समाजाची मनोधारणा बदलून मराठीचा पुरस्कार करणे आवश्यक बनलेले आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मधुकर राळेभात यांनी केले. कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल नरके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. आभारप्रदर्शन डॉ. कदम यांनी तर सूत्रसंचलन प्रा.घोगरदरे यांनी केले. तांत्रिक साहाय्य डॉ. केळकर, प्रा. मिसाळ व प्रा.शिवाजी राळेभात यांनी केले.
या कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी व प्रतिष्ठित नागरीक, अभ्यासक मोठ्या संख्येने आभासी माध्यमातून सहभागी झाले होते.





