जामखेड न्युज – – – –
कर्जत जामखेडमधील नागरिकांच्या सोयीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून मोफत शिकाऊ वाहन परवाना देण्याच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
अहमदनगर प्रादेशिक परिवहन कार्यालय, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री व पूर्वीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील साहेब व आताच्या उर्मिला पवार मॅडम तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचं या शिबिराला सहकार्य लाभलं. या शिबिराला मतदारसंघातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आतापर्यंत 4 हजारांहून अधिक जणांना रोहित पवारांच्या कर्जत जामखेड विकास संस्थेच्या माध्यमातून मोफत शिकाऊ वाहन परवाना देण्यात आला आहे. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील नागरिकांचा अहमदनगर जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाण्याचा खर्च व वेळ वाचावा या उद्देशाने चोंडी येथे प्रादेशिक परिवहन उपकेंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर आता कर्जत व जामखेडमधील नागरिकांना पक्का वाहन परवाना माफक दरात मिळावा यासाठी चोंडी येथे प्रादेशिक परिवहन विभागाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले असून नागरिकांना मतदारसंघातच पक्का वाहन परवाना मिळवण्यासाठी चाचणी परीक्षा देता येणार आहे.
वाहन परवाना नसल्यामुळे अनेक अपघातांमध्ये विमा मिळण्यासाठी अडचण निर्माण होत होती. त्याचबरोबर वैद्यकीय मदतीसाठी शासकीय योजनांचा देखील लाभ मिळत नव्हता. ही गोष्ट ओळखून मतदारसंघातील नागरिक वाहन परवान्याअभावी अपघात झाल्यास कोणत्याही शासकीय योजनांपासून वंचित राहू नये व त्यांना विम्याची रक्कम मिळावी, यासाठी आमदार रोहित पवार हा उपक्रम राबवत आहेत.
सदरील उपक्रम हा अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू असून मतदारसंघात उपकेंद्र सुरू केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी व सर्वंकष विचार करून नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी कायम सतत झटत राहणार, असे आमदार रोहित पवार यांनी बोलून दाखवले आहे.