जामखेड न्युज – – – –
टीईटी म्हणजेच टीचर एन्ट्रन्स टेस्ट या परीक्षेत घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता महाराष्ट्र शासनाच्या शिक्षक भरतीसाठी असणाऱ्या पोर्टल परीक्षेबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. टीईटी परीक्षेत सायबर क्राइम होऊ शकतो, तर पोर्टल परीक्षेत का होऊ शकत नाही, असा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील संस्थाचालक विचारत आहेत.
टीईटी परीक्षेतील हेराफेरी बाहेर आल्यावर सबंध राज्याची शिक्षणव्यवस्था मोडकळीस आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कुंपणच शेत खात आहे म्हणूनच राज्यात आजपर्यंत टीईटीचे बोगस प्रमाणपत्र मिळवून अनेक शिक्षकांनी नोकरी मिळवली आहे. महाराष्ट्र हे असे राज्य आहे, की या राज्यांमध्ये शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी कितीही मोठा भ्रष्टाचार केला तरी त्यांना शिक्षा झालेली नाही. सध्या शिक्षण विभागात काम करणारे काही अधिकारी त्याचे उत्तम उदाहरण आहे. शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षा झाली आहे. आजपर्यंत अशी उदाहरणे पाहायलाही मिळत नाही. महाराष्ट्रात शिक्षक भरतीसाठी असणाऱ्या पोर्टलचा कार्यक्रम एजन्सीला देताना कोणते निकष लावले गेले, यात घोटाळा होणार नाहीच याची शाश्वती कोणी देऊ शकेल, असा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील संस्थाचालक विचारत आहेत.
”टीईटी परीक्षेसंदर्भात सायबर क्राइम झाल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीसाठीच्या पोर्टल परीक्षांमधील पारदर्शकता खरोखर होती का, याची खात्री करणे आवश्यक आहे. संस्थाचालकांनी मांडलेले भाकीत सुपे प्रकरणामुळे खरे ठरले. सुपे प्रकरणात सरकार काय भूमिका घेते, याकडे संबंध महाराष्ट्रातील संस्थाचालक चातकासारखी वाट पाहून आहेत. शिक्षण क्षेत्राची पवित्रता टिकवायची असेल तर असलेला कायदा कठोर करून दोषींना कडक शासन व्हायला हवे.”- विजय नवल पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ
”तुकाराम सुपे प्रकरणाचा घोटाळा पाहून शिक्षण क्षेत्रात केवळ पैशावाले नोकरी मिळवू शकतात, हे सिद्ध झाले आहे. दर्जा आणि गुणवत्ता असणारे शिक्षक कोसो मैल नोकऱ्यांपासून दूर आहे म्हणून आता शिक्षक होण्यापेक्षा बिगारी काम परवडले, अशीच म्हणण्याची स्थिती ओढवली आहे. टीईटी प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा झाली तर भविष्यात घोटाळेबाज जन्माला येणार नाही.”- उत्तमकुमार कामडी, शिक्षक, पेठ