टीईटी गैरव्यवहार – प्रश्न सोडविले ३ अन् गुण मिळाले ८४

0
252
जामखेड न्युज – – – – 
टीईटी गैरव्यवहारात सायबर पोलिसांनी शनिवारी तत्कालीन शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी त्यांनी प्रीतीश देशमुख याच्या सूचनेप्रमाणे अपात्र परीक्षार्थींना पात्र असल्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना वरिष्ठ अधिकारी म्हणून सांगितल्याचे उघड झाले आहे. या टीईटी गैरव्यवहारात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
जी. ए. सॉफ्टवेअरचा डॉ. प्रीतिश देशमुख याने वरिष्ठांना हाताशी धरून एजंटांमार्फत शिक्षकांशी संधान साधले होते. जे परीक्षार्थी पैसे देण्यास तयार होतील व पैसे देतील, त्यांना परीक्षेला गेल्यावर ओएमआर शीट कोरे ठेवायला सांगत. त्यानंतर प्रत्यक्ष पेपर तपासणीच्या वेळी हे ओएमआर शीट भरून या परीक्षार्थींना पास करायचे असा हा संपूर्ण प्लॅन होता. मात्र, हे सर्वजण भष्ट्राचाराबाबत इतके निर्ढावले की, त्यांनी अनेकांचे ओएमआर शीट भरलेच नाही. त्यांना थेट पास केले.
जेव्हा सायबर पोलिसांनी ही सर्व शीट ताब्यात घेतली. त्यातील पात्र ठरलेल्या परीक्षार्थींची ओएमआर शीटची तपासणी सुरू केली तेव्हा त्यातून हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. परीक्षार्थींना शीट कोरे ठेवायला सांगितले असल्याने काहींनी किरकोळ ठिकाणी खुणा केल्या. पण, पैसे घेतल्यानंतर या परीक्षार्थींची ही कोरी शीट न भरताच त्यांची गुण वाढ केल्याचे बहुतांश शीटमध्ये दिसून आले आहे. काही जणांनी दोन, तीन प्रश्न सोडविले; पण त्यांना ८४, ८२ असे मार्कस् देऊन पास करण्यात आल्याचे तपासात आढळून आले आहेत. टीईटीच्या २०१९- २० परीक्षेतील अपात्र ७ हजार ८८० परीक्षार्थींना अशा प्रकारे पात्र करण्यात आले आहे.
२०१८ मध्ये पुनर्मूल्यांकनात केले पात्र
टीईटीच्या २०१८ मधील परीक्षेमध्येही अपात्र परीक्षार्थींना पात्र करून घेण्यात आले असून, त्यांच्याही ओएमआर शीटची तपासणी सध्या सुरू आहे. यामध्ये ज्यांच्याकडून पैसे घेण्यात आले होते; पण ते अपात्र ठरले. त्यांना पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायला सांगितले. त्यांचा ओएमआर शीट पुनर्मूल्यांकन करताना त्यांना पास करून पात्र केल्याचे आढळून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here