जामखेड न्युज – – – – –
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय अंतर्गत NCERT नवी दिल्ली द्वारे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा (इ-रक्षा स्पर्धा ) स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या हजारो विद्यार्थ्यांमधून विहित निकषांच्या आधारे अंतिम निवड करण्यासाठी रवींद्र भापकर सर यांची परीक्षक म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र त्यांना नुकतेच NCERT चे संचालक श्री अमरेंद्र बेहरा यांच्याकडून प्राप्त झाले आहे.
रवींद्र भापकर हे जि.प.शाळा सरदवाडी येथे प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असून त्यांना यापूर्वीच भारत सरकारने राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. ते NCERT नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय मार्गदर्शक म्हणून काम करतात. तसेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने त्यांची राज्याचे थिंक टॅंक सदस्य (शैक्षणिक सल्लागार) व स्टेट रिसोर्स पर्सन म्हणून निवड केलेली आहे. त्यांना याआधीच लोकमत च्या वतीने लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2020 तसेच महाराष्ट्र शासनाद्वादरे सोशल मेडिया महमित्र या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकेतस्थळ तसेच विविध शैक्षणिक अँप्सची निर्मिती केली असून देशभर शैक्षणिक कार्यशाळा घेतल्या आहेत. देशभर ते डिजिटल गुरु या नावाने परिचित आहेत.
जामखेड सारख्या ग्रामीण तालुक्यातून केवळ आपल्या शैक्षणिक कार्याच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार ते आता थेट राष्ट्रीय पातळीवर परीक्षक म्हणून स्थान मिळवले आहे. एखाद्या प्राथमिक शिक्षकाची राष्ट्रीय पातळीवर परीक्षक म्हणून निवडले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. नक्कीच ग्रामीण भागातील नवोपक्रमशील शिक्षकांसाठी ही भूषणावह बाब आहे.
त्यांच्या निवडीबद्दल राज्याचे शिक्षण संचालक श्री दिनकर टेमकर, शिक्षण उपसंचालक श्री रमाकांत काठमोरे, आय टी विभागाचे शिक्षण उपसंचालक श्री विकास गरड, शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील ,जामखेडचे गटविकास अधिकारी श्री प्रकाश पोळ , गटशिक्षणाधिकारी श्री नागनाथ शिंदे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.