जामखेड न्युज – – – –
राज्यसरकारने राज्यातील बारावी पर्यंतच्या शाळा-वर्ग कोरोनाचे नियम पाळत सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या डीडीएमए (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा)च्या बैठकीत स्थानिक परस्थिती पाहून घ्यावा असे सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांनी येत्या मंगळवारी 25 जानेवारी रोजी डीडीएमए’ची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत जिल्ह्यातील शाळा कधी सुरू करता येतील याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे कळवले आहे.
अर्थात 25 जानेवारी रोजी डीडीएमए’ची बैठक असून 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन आहे. त्यामुळे किमान 26 जानेवारी नंतरच जिल्ह्यातील शाळा सुरू होणार असे चित्र आहे.
याबाबत मनपा आयुक्त शंकर गोरे यांनीही डीडीएमए’च्या बैठकीतच मनपा हद्दीतील शाळा सुरू होण्याचा निर्णय होईल असे बोलताना स्पष्ट केले आहे. तसेच जिल्हापरिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
एकंदरीत जिल्ह्यात रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना एकूण सक्रिय रुग्णांची संख्या सहा हजारावर आज मितीला असल्याने डीडीएमए’च्या बैठकीत आरोग्य विभागाकडून तालुकवार कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्ह्यातील सर्वच शाळा उघडणार की त्या-त्या तालुक्यातील परिस्थिती पाहून निर्णय होणार तसेच नगर शहरात रोजच रुग्ण संख्येचा आलेख चढता असताना नगर शहरा बाबत काय निर्णय होणार हे मंगळवारी होणाऱ्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा या सोमवारी नव्हे तर किमान 26 जानेवारी पर्यंत तरी सुरू होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.