कायद्यासमोर सगळे समान, नियम तोडले तर कारवाई अटळ, १७ पोलिसांसह ८ कर्मचाऱ्यांना दंड

0
262
जामखेड न्युज – – – – 
 दुचाकी वाहनचालकांच्या अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती केली आहे. पहिल्या टप्प्यात विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलिसांसह खाकी वर्दीत असणाऱ्या इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या दरम्यान 17 पोलिसांवर व 8 इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नियम मोडणाऱ्या पोलिसांकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय. या कारवाईमुळे नागरिकही अवाक झाले आहेत.
वाहतुकीचे नियम मोडल्याने पोलिसांना आर्थिक दंड
जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढत आहे. अपघातात मृत्युमुखी पडण्याऱ्या अनेक दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अपघाताला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनातून वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी हेल्मेटसक्ती केली आहे.
हेल्मेटसक्ती तीन टप्प्यांत होणार आहे. प्रथम पोलीस विभाग, त्यानंतर शासकीय अधिकारी-कर्मचारी, त्यानंतर सर्वसाधारण नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार गेल्या चोवीस तासात 17 पोलिसांसह इतर विभागाच्या आठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
दरम्यान, जे पोलीस दुसऱ्यांदा विनाहेल्मेट आढळून येतील त्यांना दीड हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. सोबतच चारचाकी वाहनात सीटबेल्ट लावणे अनिवार्य करण्यात आल्याची माहिती वाहतून पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली.
     चंद्रपूर जिल्ह्य़ात ज्याप्रकारे कठोर निर्णय घेतले आहेत त्याप्रमाणे इतर जिल्ह्यातील प्रशासनाने निर्णय घ्यावेत अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य स्तरातून व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here