जामखेड न्युज – – – –
पुण्यातील (Pune) बालेवाडी (Balewadi) हायस्ट्रीट जवळील पाठशाळा परिसरातून अपहरण (Kidnap) झालेल्या स्वर्णव सतीश चव्हाण (Swarnav satish chavhan) उर्फ डुग्गू या चार वर्षीय चिमुरड्याचा अद्याप काहीही थांगपत्ता लागला नाही. 11 जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास एका अज्ञात अपहरणकर्त्याने त्याचं अपहरण केलं आहे. यावेळी स्वर्णव हा आपल्या एका लहानग्या मित्रासोबत शाळेत जात होता. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपीनं त्याचं अपहरण केलं आहे. अपहरण होऊन सात दिवस उलटून गेले आहेत. पण अद्याप चिमुकल्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे बापाची अवस्था बेहाल झाली आहे.
ADVERTISEMENT

त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘मागाल ते देतो, माझ्या काळजाच्या तुकड्याला सोडा’ (will give you whatever you want please release my son) असं आवाहन अपहरणकर्त्यांना केलं आहे. एवढंच नव्हे तर माझा मुलगा शारीरिकदृष्ट्या किरकोळ आहे. तो लगेच आजारी पडतो. त्यामुळे त्याला ताप किंवा खोकला आला तर, कोणतं औषध द्यावं, याबाबतची माहितीही अपहर झालेल्या मुलाचे वडील सतीश चव्हाण यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून दिली आहे. तसेच ‘हवे तितके पैसे घ्या, मात्र माझ्या लेकराला सोडा’ अशी आर्त विनवणी ते सतत करत आहेत.
पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी बापाची ही धडपड पाहून सोशल मीडियावरील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. तसेच राजकीय नेत्यांनी देखील स्वर्णव हरवल्याची माहिती आपल्या फेसबुकवर शेअर केली आहे. स्वर्णवला शोधण्यासाठी सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट शेअर करत, मदतीची विनंती करत आहेत.
यासोबतच सतीश चव्हाण यांनी मेडिकल स्टोअर वाल्यांना उद्देशून देखील एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. त्यानी यामध्ये म्हटलं की, जर कोणी चार वर्षाच्या किंवा आसपास वयोगटातील मुलासाठी औषध घ्यायला आलं, तर अशा लोकांवर लक्ष ठेवा. संशय आल्यास त्वरित माहिती द्या, असं आवाहनही ते करताना दिसत आहेत. मागील सात दिवसांपासून सतत सोशल मीडियावर पोस्ट करत ते मुलाला सोडण्यासाठी विनवणी करत आहेत.