रोहित पवारांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत अनेकजण कोरोनाच्या विळख्यात; आज कोरोनाची लागण झालेले नेते कोण?

0
311
जामखेड न्युज – – – – 
राज्यातला कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असून यंदा नेते, आमदार आणि मंत्र्यांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे. आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. ट्विटरवरून त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह आले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंना कोरोना
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले.
रोहित पवारांना कोरोना
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून ते पुढील सात दिवस विलगीकरणात राहणार आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 3 जानेवारी रोजी त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.
पंकजा मुंडेंना ओमिक्रॉन
भाजप नेत्या आणि राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉन संसर्ग झाला आहे. 1 जानेवारी रोजी त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. मागील वर्षी एप्रिल महिन्यात त्यांना कोरोना झाला होता. यावर्षी पुन्हा त्यांना कोरोना झाला असून ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग झाला आहे. एरवी राजकीय शत्रू असलेले भाऊ धनंजय मुंडे यांनीही पंकजा ताईंच्या तब्येतीची चौकशी केली.
अरविंद सावंत, मदन येरावार, वरुण सरदेसाई
शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. अरविंद सावंत हे संजय राऊत यांच्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. यवतमाळचे भाजप आमदार मदन येरावार तसेच शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष वरुण देसाई यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोना झाल्याचे उघडकीस आले होते.  राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली. तर भाजप नेते हर्षवर्धन पाटील, त्यांची कन्या अंकिता पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here