जामखेड न्युज – – –
गेल्या काही दिवसांपासून कमी झालेली राज्यातली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्याचे पहायला मिळत आहे. तसेच कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओम्रिक्रॉनने देखील राज्यात शिरकाव केला आहे. रुग्ण संख्या वाढतच राहिली तर पुढील काळात लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो असा इशारा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिला आहे. सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
‘देशासह राज्यावर कोरोनाचे संकट आहे. पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता देशात आणि राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते’.
‘कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढल्यास कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोख्याण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात येऊ शकते असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच जर एखाद्या मंदिर परिसरामध्ये मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत असतील, तर ते मंदिर चालू ठेवायचे की बंद याचा निर्णय मंदिर प्रशासन घेऊ शकते’ असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढू लागल्याने महाराष्ट्रात कोरोनासंदर्भातले निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 25 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सगळ्यांनी आरोग्याचे नियम पाळावेत असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
युरोप तसेच युकेमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. जगातील 110 देशांमध्ये ओमिक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणात पार्ट्या आयोजित करण्यात येतात. या पार्ट्यांना गर्दी होत असते. यातून कोरोना प्रादुर्भावाचा धोका असल्याने या पार्श्वभूमीवर राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 9 ते पहाटे 6 या वेळेत जमावबंदी असून, याकाळात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच नववर्षाच्या स्वागत पार्ट्यांवर देखील बंदी घालण्यात आली आहे.





