जामखेड नगरपरिषद नगरसेवक संख्या वाढली – निवडणूकीत चुरस वाढणार

0
287
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – ( सुदाम वराट ) 
    जामखेड नगर परिषद निवडणूकीत शासनाच्या नवीन नियमानुसार २१ ऐवजी १२ प्रभाग तर २१ ऐवजी ३ जाग वाढून २४ नगरसेवक निवडले जाणार असल्याने इच्छुक उमेदवारांची संख्याही वाढली आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना मोठी कसरत करावी लागणार असल्याचे दिसते आहे.
  नगर परिषद निवडणुकीबाबत शहराच्या लोकसंख्येच्या आधारावर नगरपालिकांची सदस्यसंख्या वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जामखेड नगरपरिषदेने यापूर्वी असलेल्या प्रभाग रचनेत बदल करून १२ प्रभागातून  नगरसेवक पदाच्या २४ जागा निश्चित केल्या असून याबाबत संख्या व प्रभाग रचना निश्चितीचा प्रस्ताव मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. नवीन प्रस्तावानुसार या पंचवार्षिक निवडणुकीत ३ नगरसेवक सदस्य संख्या वाढणार आहे.
      जामखेड नगरपरिषदेची मुदत ७ फेब्रुवारी २०२० रोजी संपुष्टात आली आहे. सद्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी निवडणूक पूर्व कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार मागील वर्षी दि.११ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत एक प्रभाग एक नगरसेवक यादृष्टीने २१ प्रभाग २१ नगरसेवक अशी प्रक्रियाही पार पडली होती. यावेळी प्रभाग रचना व मतदाराचे बदललेला प्रभाग या बाबत तक्रारी राज्य निवडणूक आयोगापर्यंत गेल्या होत्या. त्याबाबत हरकती निकाली काढण्यात येऊन केवळ निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे बाकी होते. मात्र कोरोना महामारीमुळे निवडणूक लांबली होती.
     कोरोनामुळे २०२१ ची जनगणना रखडली आहे. त्यामुळे राज्य शासनाने चार ते पाच टक्के लोकसंख्या
 वाढ गृहीत धरून नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विभागीय आयुक्तांना सदस्यसंख्या निश्चितीचे अधिकार दिले आहेत. सरकारच्या निर्देशानुसार वाढलेली लोकसंख्या गृहीत धरुन २४ जागांचा प्रस्ताव मंजुरी करिता नगरपरिषदेने पाठवला आहे.
       सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार ‘क’ वर्ग नगर पालिका क्षेत्रात निवडून आलेल्या परिषद सदस्यांची संख्या किमान २० इतकी असणार आहे. आणि २५ हजार पेक्षा अधिक असलेल्या लोकसंख्येपैकी प्रत्येक ३ हजार लोकसंखे करिता निवडून आलेला एक अतिरिक्त सदस्य असेल. असे निर्देश देण्यात आले आहे. जामखेड शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ३९ हजार ५२१ इतकी झाली आहे त्यानुसार सदस्यसंख्या २४ व १२ प्रभाग होत आहे.
       महाविकास आघाडी सरकारने एका प्रभागात दोन नगरसेवक संख्या निश्चित करण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा नव्याने निवडणूक पूर्व प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने संख्या निश्चिती नंतर प्रभाग रचना, आरक्षण, मतदार यादी आदी कार्यक्रम पुन्हा नव्याने राबविला जाणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
  एकंदर नगर परिषद निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया सुरू झाली असली तरी राजकीय पातळीवर अजून हालचालींनी वेग येताना दिसत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here