जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
सर्व समाज घटकांचा विचार करत महाविकास आघाडी सरकार काम करत आहे. शेतकरी हिताचे अनेक निर्णय राज्याने घेतले आहेत. कोरोना व इतर अनेक नैसर्गिक संकटात ही राज्यातील सर्व जिल्ह्यांना शासनाने जिल्हा नियोजनात शंभर टक्के निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी निधीचा योग्य विनियोग करून दर्जेदार विकासकामे केली पाहिजेत. अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी मार्गदर्शन केले.
ADVERTISEMENT 

जामखेड शहर व तालुक्यातील विविध विकासकामांचा एकत्रित भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, आमदार रोहीत पवार, आ.लहू कानडे, आ.निलेश लंके, आ.संग्राम जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, विनायक देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, शहाजी राळेभात, शहाजी राजेभोसले, सुर्यकांत मोरे, काॅग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योती गोलेकर, काॅग्रेसचे राहुल उगले, राजेंद्र पवार, साकतचे सरपंच हनुमंत पाटील, संजय वराट, विजयसिंह गोलेकर, रमेश आजबे, महेश निमोणकर, दिंगाबर चव्हाण, पवन राळेभात यांच्या सह विविध पक्षांच पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
ADVERTISEMENT

अजित पवार पुढे म्हणाले की, राज्यात केंद्र व राज्याच्या माध्यमातून रस्ते विकासाची अनेक कामे सुरू करण्यात आली आहेत. आमदार निधी ४ कोटी करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन मंडळांना शंभर टक्के निधी देण्यात आला आहे. शेतकरी कर्जमाफी, नैसर्गिक संकटात आपत्तीग्रस्तांना मदत,कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी भरघोस निधींच्या माध्यमातून राज्याने काम केले. शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला. जनतेने ही शासनाला पाठबळ देण्याची गरज आहे. थकीत वीज बीले भरली पाहिजेत, पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे.
ADVERTISEMENT

करोना संकटातून राज्य सावरत आहे. १० कोटींच्या पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र पुन्हा तिसरी लाट येऊ नये. यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळत कोरोना नियमावलीचे नियमितपणे पालन केले पाहिजे. असे आवाहन ही श्री.पवार यांनी यावेळी केले.
त्रिपुरामधील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये तुरळक जाळपोळ झाली.याबाबत बोलतांना श्री.पवार म्हणाले, काही समाजकंटक लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. अशा लोकांच्या भूलथापांना बळी होऊ नका. अफवांवर विश्वास ठेवू नका. राज्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर जातीपातीच्या विचार न करता समाजाच्या माणूसकीचा विचार करा.
श्री.पवार पुढे म्हणाले, ऊसाला जास्तीत भाव मिळावा यासाठी शासन साखर कारखानादारांशी चर्चा करत आहे. शेती उत्पादनाला चांगला भाव मिळण्यासाठी मार्केट कमिट्या मजबूत झाल्या पाहिजेत.
एस.टी. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र प्रवाशी हिताचा पण विचार झाला पाहिजे. असे ही श्री.पवार यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 

खर्डा परिसरातील संत सिताराम गड, संत गीतेबाबा, शिवपट्टण किल्ला, निंबाळकर वाडा, बारा ज्योतिर्लिंग या स्थळांचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती ही श्री.पवार यांनी यावेळी दिली.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.अशोक चव्हाण म्हणाले, कोरोना संकटात राज्याची आरोग्य सेवा बळकट करण्याचं काम शासनातर्फे करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांत कर्जत-जामखेड मध्ये ९८ कामांच्या माध्यमातून ६३७ कोटींची कामे मंजूर करण्यात आली. रस्ते कामासोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात आला. हे उल्लेखनीय आहे.
कार्यक्रमापूर्वी चौंडी येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार व उपस्थितांनी अभिवादन केले.
जामखेड शासकीय विश्रामगृह विस्तारीकरण, पंचायत समिती दुस-या मजल्याचे बांधकाम, अधिकारी-कर्मचा-यांच्या शासकीय निवासस्थानाचे बांधकाम, शहरांतर्गत सिमेंट कांक्रिट रस्ता , नगरपरिषद प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, नाना-नानी उद्यान, सामाजिक सभागृह, व्यापारी संकुल, मुस्लिम दफनभूमी बांधकाम व सुशोभीकरण अर्थसंकल्प व विशेष दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत मंजूर १२० किमी लांबीचा रस्ता, १४०रूपये कोटींच्या पाणी पुरवठा योजना व जामखेड शहरातील विविध कामांचा लोकार्पण सोहळा यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी जामखेड येथे कोरोना काळात उत्कृष्ट आरोग्य सेवा देणारे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ.रवी व शोभा आरोळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.