जामखेड न्युज – – – –
नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांबरोबरच विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने नगर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने गाठीभेटी आणि संपर्क साधीत इच्छुकांनी आतापासूनच मतदारांपर्यंत पोहचण्यावर भर दिला आहे.
ADVERTISEMENT 

नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, अकोले, नेवासे, शेवगाव, पारनेर या नगरपालिका-नगरपंचायतींची मुदत संपली आहे. सध्या तिथे प्रशासक नियुक्त आहेत. भिंगार छावणी परिषद सदस्यांचीही मुदत संपली आहे. छावणी परिषदेवर आता केंद्र सरकारने उपाध्यक्ष म्हणून पक्षाच्या पदाधिकाऱ्याची वर्णी लावली आहे. याचबरोबर येत्या डिसेंबरपर्यंत श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, राहता, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी या नगरपालिकांची मुदत संपते आहे. नगर शहराजवळील बाराबाबळी, वडारवाडी, नागरदेवळे या तीन ग्रामपंचायतीची मिळून एक नगरपरिषद, नागरदेवळे नगरपरिषद स्थापन करण्याची अधिसूचना नुकतीच नगरविकास विभागाने जारी केली आहे. येत्या सहा महिन्यांत निवडणूक अपेक्षित आहे.
ADVERTISEMENT

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेची मुदत डिसेंबरअखेरीस संपुष्टात येत आहे. या मतदारसंघाचे गेली १२ वर्षे राष्ट्रवादीचे अरुण जगताप प्रतिनिधित्व करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यांच्या जिल्ह्यात ५१४ जागा आहेत. त्यातील सात पालिकांची (भिंगार छावणी परिषदेसह) मुदत संपुष्टात आल्याने ११८ जागा रिक्त आहेत. आणखी आठ पालिकांची मुदत डिसेंबरअखेरीस संपुष्टात येत आहे. तेथे २०० जागा आहेत. विधान परिषदेच्या जागेची निवडणूक मुदतीत झाल्यास ३९६ मतदार असणार आहेत. हे प्रमाण एकूण मतदारसंख्येच्या ७७.०४ टक्के आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक वेळेत होईल, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जाते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी नगर दौऱ्यावर आहेत. यावेळी विधान परिषद निवडणुकीबाबत ते पक्ष पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे
ADVERTISEMENT

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पक्ष चिन्हावर होणाऱ्या, स्थानिक पातळीवरील पालिका, नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेच्या प्रथमच निवडणुका होत आहेत. भाजपने स्वबळावर लढण्याचे जाहीर केले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी जमेल तेथे स्वबळावर व जमेल तेथे आघाडी करून निवडणूक लढविण्याचे धोरण स्वीकारले आहे. भाजपबरोबर कोणत्याही परिस्थितीत युती करायची नाही, असे धोरण शिवसेनेने जाहीर केले आहे. स्थानिक पातळीवर यापूर्वी हे तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात झुंजले आहेत. या वेळी चित्र कसे असेल याबाबत आताच काही अंदाज वर्तविता येणार नाही.
ADVERTISEMENT

निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. परंतु स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी आघाडी झाली, तर त्याला विरोध नाही. निवडणुकीच्या तयारीसाठी स्थानिक पातळीवर बैठका आणि कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरू आहे.
– बाळासाहेब साळुंखे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस
ADVERTISEMENT

कोणत्याही परिस्थितीत भाजपशी आघाडी करायची नाही, अशा स्पष्ट सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांबरोबरच आघाडी केली जाईल, अन्यथा स्वबळावर निवडणुका लढवल्या जातील. जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे.
– शशिकांत गाडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर आणि पक्षाच्या चिन्हावरच लढणार आहे. भाजपला जिल्ह्यात अन्य कोणत्या पक्षाबरोबर आघाडी करण्याची आवश्यकता भासत नाही.
–अरुण मुंडे, जिल्हाध्यक्ष, भाजप
सर्व निवडणुकांसाठी पक्ष सज्ज आहे. त्याचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जेथे शक्य आहे तेथे आघाडी अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवली जाईल.
– राजेंद्र फाळके, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.