जामखेड न्युज – – – –
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणामुळे (एनएएस) कमी झालेली दिवाळी सुट्टी पुन्हा वाढवून मिळाली आहे. 12 नोव्हेंबर रोजी देशभरात एनएएस सर्वे होणार असल्याने राज्यातील शाळांना 10 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टी देण्यात आली होती. पण आता राज्याच्या शिक्षण संचालकांनी हा सर्वे पार पडल्यानंतर पुन्हा शाळांना सुट्टीचे नियोजन करण्यास परवानगी दिली आहे. शाळा 12 नोव्हेंबरनंतर पुन्हा सुट्टी घेऊ शकतात किंवा आताची सुट्टी नाताळ किंवा उन्हाळी सुट्टीमध्ये समायोजित करू शकतात, अशा सूचना शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी जारी केल्या आहेत.

शिक्षण उपसंचालक, शिक्षण निरीक्षकांना शाळांना 1 ते 20 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी जाहीर केली होती. मात्र शालेय शिक्षण विभागाने आयत्यावेळी परिपत्रक जारी करून 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत सुट्टीचे नवे आदेश जारी केले. यामुळे राज्यभरात दिवाळी सुट्टीवरून गोंधळ निर्माण झाला होता. आधी 20 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी देण्यात आल्याने त्यानुसार पालक, शिक्षकांनी गावी जाण्यासाठी बस, ट्रेनचे आगाऊ बुकींग केले होते. मात्र सुट्टीच्या नव्या आदेशामुळे सर्वांचेच नियोजन कोलमडले होते. विविध शिक्षक संघटनांनी 20 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टी देण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली होती. शिक्षक परिषदेच्यावतीने तर थेट केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या नवी
दिल्ली शास्त्री नगर येथील कार्यालयात जाऊन दिवाळी सुट्टी
वाढवून देण्यासाठी निवेदन दिले होते. त्यानंतर बुधवारी
राज्याच्या शिक्षण संचालकांनी एनएएस परीक्षेमुळे दिवाळीची सुट्टी कमी झाली असेल तर नियमाप्रमाणे वर्षभरातील 76 सुट्टयांचे नियोजन करून दिवाळी सुट्टी या परीक्षेनंतर किंवा नाताळ अथवा उन्हाळी सुट्टीमध्ये घ्यावी, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत.