जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
एकवेळ अशी परिस्थिती होती की, तालुक्यातील सर्व पदे भाजपाच्या ताब्यात, प्रा. राम शिंदे तर सात खात्यांचे मंत्री, मार्केट कमेटी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सर्व भाजपाकडे आणि परिस्थिती अशी की, पुढील निवडणूकीतही भाजपा-सेनेचेच सरकार येणार असं पत्रपंडित छातीठाकपणे सांगत होते.
राष्ट्रवादीच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्येही चलबिचल सुरु होती. विरोधात तरी किती दिवस राहायचं असं म्हणत अनेक जण सोयीनुसार राम शिंदेच्या मागे फिरू लागली होती. पण काहीही झालं तरी पवार साहेबांचा पक्ष सोडाचा नाही, कोणतीही वेळ कायम स्वरूपी कधीच नसते, एकही पद मिळाले नाही तरी चालेल पण शेवटच्या श्वासापर्यंत पक्ष सोडणार नाही. एवढेच नव्हे तर वाढवणार, पक्षाला तालुक्यात पुन्हा चांगले दिवस आणणार असा निर्धार करुन जामखेड तालुक्यात एक कार्यकर्ता एकाकी अनेक वर्ष लढत होता त्याचं नाव राजेंद्र कोठारी !
तसं कोठारी घराणं हे पहिल्यापासून पवार साहेबांच्या विचारांवर निष्ठा ठेवून काम करणारं. सुरुवातीपासून हे घराणं कॉग्रेस बरोबरच होत. वडिल कै. सुभाष कोठारी हे अनेक वर्ष जिल्हापरिषद सदस्य तर चुलते कै. बन्शीलाल कोठारी हे स्वातंत्र्य सैनिक उच्चाधिकार समितीचे सचिव त्यांच्या सावलीत वाढलेल्या राजेंद्र यांना राजकारणाचं बाळकडू हे घरातूनच मिळालेल. राजेंद्र वयाच्या फक्त पंधराव्या वर्षापासून राजकारणात सक्रिय झाले आणि कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय असल्यामुळे त्यांना संधीही मिळत गेली. जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जामखेड तालुका अध्यक्ष, प्रदेश संघटक, प्रदेश सरचिटणीस यासह विविध संघटनात्मक पदे त्यांनी भूषविली
आणि भूषविलेल्या या सर्व पदांना न्याय देण्याचेही काम त्यांनी केले. युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना पक्षाकडून एक पैसाही निधी उपलब्ध होत नसताना त्यांनी नगर येथे युवक काँग्रेसचे स्वतंत्र कार्यालय सुरु केले, जिल्हाभर फिरुन व मोठ्या नेत्यांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून पक्षात चैतन्य जागृत ठेवण्याचे काम त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जामखेड तालुका अध्यक्ष असताना मा. अजितदादा म्हणाले, “राजेंद्र तु मला जिल्हा परिषदेच्या तीनही जागा निवडून आणून दाखव मी तालुक्याच्या विकासाला मदत करील.” आणि राजेंद्र यांनी अतिशय जिद्दीने जिल्हा परिषदेच्या तिनही जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळवून दिला.
पंचायत समितीमध्ये पक्षाचे केवळ दोन सदस्य निवडून आलेले असताना ते सभापती तर झालेच मात्र पाच वर्ष पंचायत समितीची सत्ता ताब्यात ठेवण्याची किमयाही त्यांनी करून दाखविली सर्वांना बरोबर घेवून काम कसे करावे याचा वस्तूपाठच त्यांनी घालून दिला. माझ्या तालुक्यातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी जामखेड येथे यशवंत नागरी पत संस्थेची स्थापना करून त्यामाध्यमातून हजारो बेरोजगारांना व्यवसायाठी भाडवल उभारणीसाठी त्यांनी हातभार लावला.
जामखेड नगरपरिषदेची निवडणूक लागली होती. भाजपाच्या निवडणूकीचे नियोजन तात्कालीन पालकमंत्री राम शिंदे करणार होते. संपूर्ण वातावरण भाजपाला अनुकुल होते, राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त तीन ते चार उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती होती. या सर्व परिस्थितीच अकलन करून या निवडणूकीसाठी शेजारील आष्टी मतदार संघातील आमदार सुरेश धस यांची मदत घेतली तरच राष्ट्रवादी काहीतरी चमत्कार करू शकेल हे चाणाक्ष राजेंद्र यांनी ओळखले आणि पक्षश्रेष्ठीकडे आग्रह धरून सुरेश धस यांची या निवडणूकीसाठी पक्षनिरिक्षक म्हणून नेमणूक करायला लावली आणि सुरेश धस याच्या मार्गदर्शनाखाली भाजपाला धोबीपछाड देत निवडणूक जिंकून जामखेड शहराचा प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला.
विधानसभा निवडणूक लांब असतानाच प्रा. राम शिंदे यांचा पराभव मतदार संघातील एकही कार्यकर्ता करु शकणार नाही हे त्यांनी हेरलं आणि आमदार हा आपल्या पक्षाचाच हवा हा तर त्यांचा ध्यासच होता. मग त्यांनी अजितदादांकडे पाठपुरावा सुरु केला. राम शिंदेचा पराभव करायचा असेल तर त्यासाठी पवार घराण्यातील माणूस हवा. आणि म्हणूनच त्यांनी अजितदादांच्या पत्नी सौ. सुनेत्राताईंना कर्जत-जामखेड मधून उमेदवारी देण्यात यावी म्हणून आग्रह धरला दादाही हसून अरे देतो रे बाबा, आमच्याच घराण्यातील उमेदवार देतो असेही म्हणाले…
मात्र निवडणूका जवळ आल्यानंतर रोहित पवार हे निवडणूक लढविण्यास उत्सुक असल्याचे लक्षात येताच मा. पवार साहेबांची प्रत्यक्ष भेट घेवून रोहितदादांना कर्जत-जामखेड मतदार संघाची उमेदवारी देण्यात यावी म्हणून आग्रही मागणी राजेंद्र यांनी केली. मतदार संघाची परिस्थिती व विजयाच समिकरण याबाबत विस्तृत पत्र दिलं. आणि पवारसाहेब व पक्षानेही रोहितदादांना उमेदवारी दिली. त्यांचा प्रचंड मोठा विजय झाला. माझा माझ्या पक्षाचा आमदार झाला, आपलं स्वप्न पूर्ण झालं असे उदगार त्यावेळी त्यांच्या तोंडातून बाहेर पडले.
एकनिष्ठ कार्यकर्ता कसा असावा याचा वस्तूपाठ म्हणजेच राजेंद्र कोठारी ! राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, क्रिडा, कला, बैंकिंग, शेती, उद्योग आदी क्षेत्रातही ते लिलया वावरत होते. या सर्व क्षेत्रामध्येही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. आणी हे सर्व करत असताना कौटुंबिक जबाबदा-याही त्यांनी लिलया पार पाडल्या. त्यांची तिनही मुले उच्चशिक्षित असून विविध क्षेत्रांध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत..
राजकारणातही शरद पवार, वसंतदादा पाटील, आण्णासाहेब शिंदे, बाळासाहेब थोरात, यशवंतराव गडाख, मारुतराव घुले, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, आप्पासाहेब राजळे यांच्याशी कोठारी परिवाराचे अतिशय स्नेहाचे संबंध होते. यासर्वांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी राजेंद्र यांना प्राप्त झाली. त्यांच्या संस्कारातूनच राजेंद्र यांचे व्यक्तीमत्व घडत गेले. आकारत गेले.. पवारसाहेबावर प्रचंड प्रेम असणारा हा माणूस, आणी पवार साहेबांनीही नेहमीच त्यांच्या पाठीवर हात ठेवला. त्यांना योग्य ती किंमत दिली. पवार साहेबाची त्यांना मुंबई अथवा दिल्लीत भेट मिळाली नाही किंवा जामखेडहून जाताना पवारसाहेब त्यांचेकडे थांबले नाहीत, त्यांची आठवण काढली नाही असं कधीच झालं नाही. नुकताच राजेंद्र कोठारी यांचा वाढदिवस झाला वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा !