जामखेड प्रतिनिधी
“राज्यातील गडकिल्ले हा आपल्या परंपरेचा एक ऐतिहासिक ठेवा आहे.आज तरूणाई मोठ्या प्रमाणावर दुर्गसंवर्धनात काम करते, मात्र या कार्याला एक व्यापक स्वरूप यायला हवे, महाराजांच्या विचारांचा प्रसार, गडकिल्ल्यांवरील स्वच्छता व संवर्धन हीच खरी शिवभक्ती” असे मत राष्ट्रवादीचे युवा नेते,आ. रोहित पवार यांनी पुण्यातील घोले रोड येथील पं. जवाहरलाल नेहरू सभागृहात आयोजित दुर्गराज गडकिल्ले बांधणी स्पर्धेच्या पारितोषीक वितरण सोहळ्याच्या निमीत्ताने व्यक्त केले.

सृजन आयोजित राज्यस्तरीय दुर्गराज गडकिल्ले बांधणी स्पर्धेचा पारितोषीक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी आ.रोहित पवार, दुर्ग अभ्यासक व लेखक रामनाथ आंबेरकर आणि संवर्धन अभ्यासक मृदूला माने तसेच ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई व प्रकाश अकोलकर, स्पर्धेचे परिक्षक प्रमोद बो-हाडे हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी दुर्गराज गडकिल्ले बांधणी स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक मोठ्या संख्येने या पारितोषीक वितरण सोहळ्याला उपस्थित होते. “शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त महाराष्ट्रस्तरावर अभिनव उपक्रम राबवण्याच्या उद्देशातून ही स्पर्धा राबवण्यात आली. दुर्गराज गडकिल्ले बांधणी स्पर्धेत राज्यभरातून स्पर्धकांनी सहभाग घेत अतिशय सुरेखपणे व तितकीच अभ्यासूपणे गडकिल्ल्यांची प्रतिकृती तयार केली. परंतू आपल्याला या स्पर्धेपुरतेच न थांबता गडकिल्ल्यांच्यी आजची दुरवस्था मिटवून टाकण्यासाठी एक व्यापक चळवळच हाती घ्यायला हवी. गडकिल्ले बांधणी स्पर्धा प्रत्येक स्तरातून आयोजित करून आपली परंपरा जपायला हवी.” असे रोहित पवार म्हणाले. “गडकिल्ल्यांच्या माध्यमातून अॅडव्हेन्चर इन्स्टिट्यूट सुरु करायला हवी. मॉडर्न टेक्नॉलॉजी आत्मसात करून किल्ले पर्यटनात व्हर्चुअल रिअॅलीटीचा अवलंब करायला हवा, राज्यातील महत्वाच्या पाच किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा द्यायला हवा व किल्ल्यांचे शास्त्रोक्त पध्दतीने Documentation व्हायला हवे” असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.
‘सृजन’तर्फे आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतून शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय दुर्गराज गडकिल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दीपावलीनिमीत्त १ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. मुख्य स्पर्धा व मुक्तछंद या दोन गटात झालेल्या स्पर्धेत स्पर्धकांनी तयार केलेल्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती व्हिडीओ क्लीपच्या माध्यमातून आयोजकांपर्यंत पोहचवल्या. यंदाचे या स्पर्धेचे पहिले वर्ष होते. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यावेळी मुंबई येथील अभंग रीपोस्ट बँडने विठ्ठलनामाचा गजर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषीके देऊन गौरवण्यात आले.
राज्यभरात ३० जिल्ह्यांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत १० हजारहून अधिक स्पर्धकांनी, तर ३०० मित्र मंडळांनी सहभाग नोंदवला. युवांमध्ये एक संघटनात्मकता व सकारात्मकता निर्माण निर्माण व्हावी तसेच कोरोना महामारीमुळे घरी असणा-या विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळून त्यांच्यात सृजनशीलता निर्माण व्हावी, आपला सांस्कृतिक वारसा जोपासण्याबरोबरच ऐतिहासीक महत्व दृढ व्हावे हा स्पर्धा आयोजनामागचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेच्या निमीत्ताने गड किल्ले संवर्धनासाठी सूचना देखील मागवण्यात आल्या होत्या. यातील काही निवडक सूचना आ. रोहित पवार यांच्यामार्फत संवर्धनाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी शासनापर्यंत पोहचवण्यात येणार आहेत. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुणाल रेगे यांनी केले.
_________________________________
*स्पर्धेचा निकाल-*
मुक्तछंद-
दुर्गामाता मित्र मंडळ- प्रथम (पुणे)
शुभम लांडगे- द्वितीय (पुणे)
शंकर नागार- तृतीय (पेण-रायगड)
*मुख्य स्पर्धा-*
किल्लेदार प्रतिष्ठान- प्रथम (नागपूर)
शिवप्रताप ग्रुप- द्वितीय (नागपूर)
भैरवनाथ तरूण मंडळ- तृतीय (पुणे-लोणावळा)
*कर्जत जामखेड- (अहमदनगर)*
दिव्यम कोरहाळे- प्रथम
अमृता खेटमलास- द्वितीय
प्रिया कुरुमकर- तृतीय