जामखेड न्युज – – – –
राहुरी शहरातून जाणाऱ्या मुळा नदी पात्रात गणपती घाटाजवळ दोन तरुण वाहून गेल्याची घटना आज मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. घटनेचे वृत्त समजताच मुळा नदीकाठी प्रचंड गर्दी झाली. तहसीलदार एफ.आर. शेख, मुख्याधिकारी सचिन बांगर, कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी शोध मोहीम हाती घेतली. मात्र मृतदेह सापडले नव्हते.
सध्या मुळा धरणातून सुमारे आठ हजार क्युसेसपेक्षा अधिक पाणी सोडण्यात आले आहे. त्यातच सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे पाण्याचा वेगही प्रचंड प्रमाणात होता. मंगळवारी दुपारी पाच तरुण नदीपात्रालगतच्या गणपती घाटाजवळील पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. पोहता येत नसल्याने राहुल बाळू पगारे व सुमित बाळू पगारे (रा. बुरुड गल्ली, राहुरी) हे दोन सख्खे भाऊ पाण्यात वाहून गेले तर तीघेजण बालंबाल बचावले. स्थानिक तरुणांनी शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल ठरला.
नदीपात्रात मोठे खड्डे पडलेले असून काही ठिकाणी झाडे उगवली आहेत. त्यामुळे अडथळे निर्माण झाले. घटनास्थळी आरडाओरडा होताच स्थानिकांनी नदीकडे धाव घेतली. तरुणांच्या नातेवाईकांचा धीर सुटला त्यामुळे एकच कल्लोळ झाला. मृतदेह शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. दोन सख्खे भाऊ अनेकांच्या डोळ्यादेखत वाहून गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.