जामखेड न्युज – – –
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यातील वाद विकोपाला गेलाय. विशेष म्हणजे शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा दाखल केलाय. अनिल परबांच्या दाव्याची दखल घेत न्यायालयानंही आता किरीट सोमय्यांना फटकारलंय. अनिल परब यांच्या मानहानीप्रकरणी किरीट सोमय्या यांना समन्स बजावण्यात आलंय. 23 डिसेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे सोमय्यांना कोर्टानं आदेश दिलेत. अनिल परबांनी सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलाय.
कायदेशीर नोटीस देऊन 72 तासांत माफी मागण्याचे आवाहन
खरं तर सोमय्यांविरोधात दावा दाखल करत असल्याची माहिती अनिल परबांनी ट्विट करत दिली होती. किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन 72 तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केलाय, असं परब यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
आधी नोटीस, आता दावा
अनिल परब यांनी 14 सप्टेंबर रोजी सोमय्यांविरोधात 100 कोटींच्या अबुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं होतं. परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमय्यांना एक नोटीस पावली आहे. त्यानुसार आता सोमय्या यांना 72 तासात उत्तर देण्यास सांगतिलं आहे. सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसंच परिवहन विभागात बदल्याचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोपही सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर परब यांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
सोमय्या काय म्हणाले?
परब यांनी नोटीस पाठवल्यानंतर सोमय्या यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. अनिल परब यांच्या दाव्याला आपण भीक घालत नाही. आता शिवसेनेला असं वाटणार नाही की फक्त आमचेच घोटाळे बाहेर काढतात. आता विदर्भातील काँग्रेसचे मंत्री टार्गेटवर असल्याचा इशाराच सोमय्या यांनी दिला होता. कोट्यवधी रुपयांचे घोटाळे बाहेर येणार आहे. एनसीपी परिवारातील एक मोठा घोटाळा बाहेर येणार आहे, असं सोमय्या म्हणाले. दरम्यान, विदर्भातील काँग्रेस मंत्र्यांपैकी सोमय्या यांचा रोख कुणाकडे आहे? असा सवाल आता विचारला जातोय. विदर्भात काँग्रेसचे सुनिल केदार, विजय वडेट्टीवार आणि यशोमती ठाकूर या मंत्री आहेत. तर राष्ट्रवादी परिवारातील आता कोणता मंत्री सोमय्यांच्या रडारवर आहे, हे पाहणही महत्वाचं ठरणार आहे.










