जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
देशाची शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी ग्रंथालये बळकट करणे महत्त्वाचे आहे कोणत्याही युगात किंवा भविष्यात ग्रंथालयाशिवाय शिक्षणाचे अस्तित्व अशक्य आहे. ग्रंथालय हे शिक्षणाचे मुख्य केंद्र आहे. जेथे पुर्ण जगाचे ज्ञान मिळते. यामुळेच जामखेड महाविद्यालय जामखेड येथे भव्य दिव्य असे ग्रंथालय उभारत आहोत असे मत दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे संचालक अशोक शिंगवी यांनी व्यक्त केले.
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या जामखेड महाविद्यालय जामखेड येथे आज नुतन ग्रंथालय इमारतीचा पायाभरणी भुमीपुजन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव शशिकांत देशमुख, उपाध्यक्ष अरुणशेठ चिंतामणी, सहसचिव दिलीपशेठ गुगळे, खजिनदार राजेशजी मोरे, सुमतीलाल कोठारी, एम. एम. खान, जामखेड महाविद्यालयाचे माझी प्राचार्य आर. बी. देशमुख उपप्राचार्य डॉ. सुनिल नरके, क्रीडा संचालक प्रा. मधुकर राळेभात, ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, डिप्लोमा कॉलेज प्राचार्य विकी घायतडक, पर्यवेक्षक रमेश अडसूळ, ग्रंथालय विभाग प्रमुख माने सर, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष उद्धव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची प्रगती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
यावेळी बोलताना शिंगवी म्हणाले की, शिक्षण पद्धती सुधारित करण्यासाठी ग्रंथालय विकासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. या ग्रंथालयाच्या उभारणीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा खुप मोठा फायदा होणार आहे. या ग्रंथालयात मुलांसाठी तसेच मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका असणार आहे. स्पर्धा परीक्षा व नियमित परीक्षांचा अभ्यास करताना या ग्रंथालयाचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
जामखेड महाविद्यालय जामखेडचे माजी प्राचार्य आर. बी. देशमुख यांनी या ग्रंथालय उभारणीसाठी एकवीस लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीमुळे भव्य दिव्य असे सुमारे चार हजार क्वेअर फुटाचे अद्ययावत ग्रंथालय उभे राहिल याचा फायदा ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना होईल. यावेळी माजी प्राचार्य आर. बी. देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.