Monday, February 16, 2026
Home ताज्या बातम्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आज दिले जाणार थकीत वेतन!!

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आज दिले जाणार थकीत वेतन!!

0
498
जामखेड न्युज – – – 
 एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटींचा निधी तातडीने वितरित करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले त्यानंतर हे पैसे गुरुवारी एसटी महामंडळाच्या खात्यात जमा झाले. त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांचे आज म्हणजेच शुक्रवारी वेतन होईल, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी जाहीर केले. हा जुलै महिन्याचा थकीत पगार आहे.
    टाळेबंदीमुळे प्रवासावर निर्बंध आल्याने एसटी फेऱ्या आणि उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला. महसुलाअभावी एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे हाल सुरू आहेत. ही बाब लक्षात घेऊन चालू आर्थिक वर्षासाठी १४५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी आधी दिलेले ८३८ कोटी रुपये वगळता उर्वरित ६१२ कोटींपैकी ५०० कोटी तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिला. त्यानंतर तातडीने हा निधी वितरित करण्यात आला.
    एसटी महामंडळाला हा निधी मिळाल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी महामंडळाचे प्रमुख शेखर चन्ने यांना कर्मचाऱ्यांचे पगार तात्काळ करण्याचा आदेश दिला. तसेच एसटी महामंडळाला ५०० कोटी रुपये दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानत शुक्रवारीच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होतील, अशी घोषणा परब यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!