क्रीडा क्षेत्रात जामखेडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शालेय जिल्हास्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कॅडेट सार्थक गणेश पवार याने विभागीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. त्याच्या या यशामुळे जामखेडच्या क्रीडाक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर येथील वाडियापार्क क्रीडा संकुलात शालेय जिल्हास्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत १७ व १९ वर्षांखालील वयोगटातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत कॅडेट सार्थक गणेश पवार याने आपल्या कौशल्याच्या जोरावर प्रभावी कामगिरी करत विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. सार्थक पवार हा जामखेड शहरातील पोलीस स्टेशनसमोरील रहिवासी असून गणेश पवार यांचा चिरंजीव आहे. तो सध्या श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे-पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही सातत्यपूर्ण मेहनत घेत त्याने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
सार्थकला मुख्य प्रशिक्षक महादेव काकडे व आमिर शेख यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभत आहे. तसेच क्रीडा समन्वयक संभाजी निकाळजे, अभिजीत दळवी, छबुराव काळे, अशोक पानखडे, गणेश शिंदे, विजय गायके, साहेबराव दाने, शैलेश दाणे, नीलेश पैठणे, संदीप वाघमारे, समीर पठाण, राहुल धनवटे, राहुल शेळके, विकास मस्के, विकास गर्जे व प्रियांका रासने यांचेही मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्ष सुमती साहेबराव घाडगे-पाटील, उपाध्यक्ष स्नेहल घाडगे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गौरव आमले-पाटील, सहसचिव डॉ. श्रुती घाडगे-पाटील, विश्वस्त चेतन चव्हाण-पाटील, प्राचार्य सोपान काळे, समन्वयक दत्तात्रय वांडेकर, निवासी प्राचार्य एकनाथ कापसे, क्रीडा संचालक संभाजी निकाळजे, उपप्राचार्य शांतीलाल म्हेत्रे, विभागप्रमुख अशोक गाडे, नामदेव ताके, राजेंद्र कात्रज, मिलिंद सोनवणे, जितेंद्र पाटील, पांडुरंग कांबळे, संजय गडाख, बाळासाहेब साबळे, गणेश कोरडे यांच्यासह सर्व सैनिकी प्रशिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सार्थकचे अभिनंदन केले.
तसेच शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे व त्यांच्या मित्रपरिवारानेही सार्थकचा गौरव करून आगामी विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हास्तरावरून विभागीय स्तरापर्यंत मजल मारणाऱ्या सार्थकच्या या यशामुळे जामखेडच्या क्रीडा क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली असून आगामी स्पर्धेतही तो यशाची परंपरा कायम राखेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.