जामखेड न्युज – – – – –
सौताड्यात बिबट्याचा धुमाकूळ! रामाचा घोडा हल्ल्यात ठार, पंचक्रोशीत हळहळ, वनविभागाकडून पंचनामा!
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र रामेश्वर तीर्थक्षेत्र सौताडा येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेला ‘रामाचा घोडा’ बिबट्या / वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची दुःखद घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सौताडा, भुरेवाडी, घुलेवाडी आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

अनेक वर्षांचा जिव्हाळा
हा घोडा अनेक वर्षांपासून परिसरातील नागरिकांच्या श्रद्धेचा आणि प्रेमाचा केंद्रबिंदू होता. श्री क्षेत्र रामेश्वर येथे भगवान श्रीरामाचा घोडा म्हणून त्याची ओळख होती. भुरेवाडी येथील रामभक्त अर्जुन शेंबडे हे गेल्या अनेक वर्षांपासून त्याची देखभाल करत होते. सौताडा, भुरेवाडी, घुलेवाडीतील ग्रामस्थही त्याची काळजी घेत होते.

उन्हाळ्याचे दिवस, पाण्याची टंचाई आणि शेतात चारा नसल्याने हा घोडा रोज भुरेवाडी जवळच्या डोंगराळ भागात चरायला जात असे. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो जंगलात गेला असता काही ग्रामस्थ त्याला पाहायला गेले असता तो हल्ल्यात मृतावस्थेत आढळला.

वनविभागाचा पंचनामा
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी मुंडे साहेब आणि जायभाय साहेब यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला बिबट्याने नव्हे तर वाघाने केल्याची माहिती वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी मुंडे यांनी दिली आहे. लवकरच परिसरात ट्रॅप लावून वाघाला पकडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.





