Wednesday, November 4, 2026
Home ताज्या बातम्या तलवारबाजीत जामखेडच्या तनुजाची ऐतिहासिक भरारी! राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड शंभुसूर्य संस्था व...

तलवारबाजीत जामखेडच्या तनुजाची ऐतिहासिक भरारी! राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड शंभुसूर्य संस्था व ल. ना. होशिंग विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा!

0
2
तलवारबाजीत जामखेडच्या तनुजाची ऐतिहासिक भरारी! राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड  शंभुसूर्य संस्था व ल. ना. होशिंग विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा!

जामखेड न्युज – – – – – 

तलवारबाजीत जामखेडच्या तनुजाची ऐतिहासिक भरारी! राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

शंभुसूर्य संस्था व ल. ना. होशिंग विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा!

जिद्द, चिकाटी आणि कठोर सरावाच्या जोरावर जामखेडच्या कन्येने क्रीडाक्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जामखेड येथील श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेची खेळाडू आणि ल. ना. होशिंग माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. तनुजा संतोष निमोणकर हिची शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलात होणाऱ्या या स्पर्धेत ती अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तनुजाच्या या यशामुळे जामखेडच्या क्रीडाविश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

१७ वर्षांखालील मुलींच्या गटातील ‘सेबर’ या तलवारबाजी प्रकारात तनुजाने जिल्हा व विभागीय स्तरावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. आपल्या कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर तिने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारली. विशेष म्हणजे तलवारबाजी या क्रीडाप्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणारी तनुजा ही जामखेडमधील पहिलीच खेळाडू ठरली आहे. त्यामुळे तिचे हे यश जामखेडच्या क्रीडाक्षेत्रासाठी विशेष अभिमानास्पद मानले जात आहे.

तनुजाला श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रशिक्षक संतोष (बबलू वस्ताद) टेकाळे, प्रशिक्षक सुनील गोडळकर व ओंकार सुराग यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ल. ना. होशिंग माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बी. ए. पारखे, क्रीडाशिक्षक राघवेंद्र धनलगडे, प्रल्हाद साळुंके, बापू जरे आणि धीरज पाटील यांनीही तिला प्रोत्साहन व मार्गदर्शन केले.

तनुजाच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव तथा प्रशिक्षक अमोल निमोणकर, उपाध्यक्ष राजेंद्र भांबे, विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद, क्रीडाप्रेमी आणि जामखेड ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

चौकट

आर्थिक अडचणींवर मात करत ऑलिंपिकपटू घडविण्याचे शंभुसूर्य संस्थेचे स्वप्न!

जामखेडसारख्या दुष्काळी भागात श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्था स्वखर्चातून अनेक खेळाडूंना विविध क्रीडाप्रकारांचे मोफत प्रशिक्षण देत आहे. ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळावे आणि भारतासाठी ऑलिंपिक खेळाडू घडवावेत, हे संस्थेचे मोठे ध्येय आहे. मात्र, संस्थेचे उद्दिष्ट मोठे असले तरी आर्थिक अडचणी हा त्यांच्यासमोरील महत्त्वाचा अडसर ठरत आहे. अशा परिस्थितीतही संस्थेच्या खेळाडूंनी राज्यस्तरापर्यंत मजल मारणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. तनुजाची निवड ही संस्थेच्या मेहनतीला मिळालेली पोचपावती असून ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन व आर्थिक पाठबळ मिळाल्यास तेही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात, हे तिने दाखवून दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!