पाडळीवर शोककळा! शिक्षक भाऊसाहेब खैरे सरांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या ५६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
पाडळी (ता. जामखेड) येथील रहिवासी तथा बीड येथील महात्मा फुले विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. भाऊसाहेब छबूराव खैरे (सर) (वय ५६) यांचे आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने पाडळी गावासह शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
भाऊसाहेब खैरे सर हे बीड येथील महात्मा फुले विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त ते आपल्या मूळ गावी पाडळी येथे आले होते. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने खैरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या खैरे सरांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच शैक्षणिक क्षेत्रातील सहकाऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे. दिवाळीच्या सुट्टीत गावी आले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
अंत्यविधी आज रात्री ९ वाजता पाडळी (ता. जामखेड) येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले एक मुलगी कुटुंबीय नातेवाईक व मित्रपरिवार असा परिवार आहे.