दारूच्या नशेत कौटुंबिक वाद, आई-वडिलांनाही त्रास, पोलिसांच्या कारवाईनंतरही विक्री सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप
जामखेड तालुक्यातील देवदैठण गावात अवैध दारूविक्रीचा प्रश्न गंभीर बनला असून, दारूच्या व्यसनामुळे कौटुंबिक वाद आणि महिलांच्या त्रासात वाढ होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. खर्डा पोलिसांनी कारवाई करूनही अवघ्या दोन दिवसांत पुन्हा दारूविक्री सुरू झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संतप्त महिला व ग्रामस्थांनी अहिल्यानगर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
दारूच्या नशेत घराघरांत वाद! ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दारूच्या नशेत शिवीगाळ, मारहाण आणि घरातील साहित्याची तोडफोड करण्याचे प्रकार घडत आहेत. मुलांकडून आई-वडिलांना त्रास दिल्याच्या घटनांमुळे गावात चिंता व्यक्त होत आहे. अशा काही प्रकरणांत ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्यात आला असून, खर्डा पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
पोलिसांची कारवाई, तरीही पुन्हा विक्री! १२ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या तक्रारीनंतर खर्डा पोलिसांनी देवदैठण येथे कारवाई केली. या वेळी विष्णू राजेंद्र उगले याच्याकडून देशी व विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. मात्र, दोन दिवस दारूविक्री बंद राहिल्यानंतर १५ ऑक्टोबरला पुन्हा विक्री सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महिलांचा प्रशासनाला इशारा! अवैध दारूविक्री कायमची बंद करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
कारवाईनंतरही दारूविक्री पुन्हा सुरू कशी होते, असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. अवैध दारूविक्री बंद न झाल्यास आंदोलन व उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा महिला आणि ग्रामस्थांनी दिला आहे.