Wednesday, October 14, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये थरार! चहा पिण्यासाठी बसलेल्या राहुल अंधारेंवर सत्तूरने वार, डावा हात तुटला!...

जामखेडमध्ये थरार! चहा पिण्यासाठी बसलेल्या राहुल अंधारेंवर सत्तूरने वार, डावा हात तुटला! तोंड बांधून आलेल्या दोघांचा हल्ला, गंभीर जखमी अंधारेंना अहिल्यानगरला हलवले, पोलिसांकडून तपास सुरू

0
2
जामखेडमध्ये थरार! चहा पिण्यासाठी बसलेल्या राहुल अंधारेंवर सत्तूरने वार, डावा हात तुटला!  तोंड बांधून आलेल्या दोघांचा हल्ला, गंभीर जखमी अंधारेंना अहिल्यानगरला हलवले, पोलिसांकडून तपास सुरू

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेडमध्ये थरार! चहा पिण्यासाठी बसलेल्या राहुल अंधारेंवर सत्तूरने वार, डावा हात तुटला!

तोंड बांधून आलेल्या दोघांचा हल्ला, गंभीर जखमी अंधारेंना अहिल्यानगरला हलवले, पोलिसांकडून तपास सुरू

जामखेड शहरात तरुणावर सत्तूरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राहुल अंधारे हे पुढारी वड टी सेंटर येथे चहा पिण्यासाठी बसलेले असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी तोंड बांधलेल्या दोघांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि अचानक त्यांच्यावर सत्तूरने वार केले. या हल्ल्यात अंधारे यांचा डावा हात गंभीररीत्या जखमी झाला असून, तो तुटल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले आहे.

दुचाकीवरून तिघे आले; दोघांनी केला अचानक हल्ला

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ७.३५ वाजण्याच्या सुमारास राहुल अंधारे हे पुढारी वड टी सेंटर येथे चहा पिण्यासाठी बसले होते. त्याचवेळी दुचाकीवरून तिघेजण तेथे आले. त्यापैकी तोंड बांधलेल्या दोघांच्या हातात सत्तूर असल्याचे सांगण्यात येते. या दोघांनी हॉटेलमध्ये जाऊन अंधारे यांच्यावर अचानक वार केले.हा हल्ला अचानक झाल्याने हॉटेलमधील नागरिकांमध्ये घबराट पसरली.

हल्ल्यादरम्यान अंधारे यांच्या जखमांमधून उडालेले रक्त शेजारी बसलेल्या लोकांवरही उडाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.

प्राथमिक उपचारानंतर अहिल्यानगरला हलवले
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राहुल अंधारे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

कलाकेंद्रातील वादाची पार्श्वभूमी?
राहुल अंधारे यांच्याशी संबंधित कलाकेंद्रातील गोंधळाच्या प्रकरणात सुमारे महिनाभरापूर्वी गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी कलाकेंद्रावरून वाद झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सदर हल्ला झाला असावा, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या पूर्वीच्या घटनांचा आणि सध्याच्या हल्ल्याचा काही संबंध आहे का, हे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल; तपासाला सुरुवात
घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून, हल्लेखोरांची ओळख पटवणे आणि घटनेमागील कारणांचा शोध घेण्याच्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.

पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत. जामखेड शहरात भरवस्तीत घडलेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, हल्लेखोरांना पोलिसांकडून कधी ताब्यात घेतले जाते आणि या घटनेमागील नेमके कारण काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!