जामखेड न्युज – – – – – –
गुटखा पकडला, मग ‘गायब’ केला कुणी? जामखेड पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!
अखेर DYSP ची एन्ट्री, चौकशी सुरू!

जामखेड तालुक्यात अवैध गुटखा तस्करी आणि विक्रीचा मुद्दा ऐरणीवर आला असताना, गुटखा पकडल्याची चर्चा झाली, मात्र त्यानंतर संबंधित यंत्रणांनी नेमकी कोणती कारवाई केली? याबाबत स्पष्ट माहिती समोर आली नव्हती. नक्की कारवाई कोणी केली, गुटखा कोठून आणला होता, तो कोणाचा होता आणि पकडल्यानंतर त्याचे पुढे काय झाले? या प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यात आहेत.

या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. ०९ रोजी अहिल्यानगर येथून काही वर्तमानपत्रात वृत्त प्रसिद्ध झाले होते यात संबंधित यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या वृत्ताची दखल घेत पोलीस उपाधीक्षक सुजीत क्षीरसागर यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याने या प्रकरणाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या प्रकरणी योग्य चौकशीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते डॉ अॅड अरूण जाधव हे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देणार आहेत.

जामखेडमध्ये गुटखा सापडल्याची माहिती समोर आल्यानंतरही या प्रकरणात पारदर्शकपणे कारवाई झाल्याचे चित्र स्पष्ट झाले नव्हते. गुटखा पकडण्यात आला असेल, तर त्याचा पंचनामा झाला का? मुद्देमाल जप्त करण्यात आला का? संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला का? की प्रत्यक्ष कारवाई होण्यापूर्वीच प्रकरण मिटवण्यात आले? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.


