Friday, September 25, 2026
Home क्राईम न्यूज लोखंडी गजाचा घाव डोक्यात, तरुण गंभीर जखमी! ‘खिशातील पैसे का काढले?’...

लोखंडी गजाचा घाव डोक्यात, तरुण गंभीर जखमी! ‘खिशातील पैसे का काढले?’ म्हणत बेदम मारहाण, चौघांविरुद्ध जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

0
2
लोखंडी गजाचा घाव डोक्यात, तरुण गंभीर जखमी!  ‘खिशातील पैसे का काढले?’ म्हणत बेदम मारहाण, चौघांविरुद्ध जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

जामखेड न्युज – – – – – – 

लोखंडी गजाचा घाव डोक्यात, तरुण गंभीर जखमी!

‘खिशातील पैसे का काढले?’ म्हणत बेदम मारहाण, चौघांविरुद्ध जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

जामखेड तालुक्यातील चोभेवाडी येथे ‘खिशातील पैसे का काढून घेतले?’ या कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी गजाने डोक्यात प्रहार केल्याची गंभीर घटना २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या हल्ल्यात नितीन चंदन काळे (वय ३०, रा. चोभेवाडी, ता. जामखेड) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जामखेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चौघांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी नितीन चंदन काळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार छगन बठारू काळे, शहनाज छगन काळे, जावेद छगन काळे आणि किसाबाई छगन काळे (सर्व रा. चोभेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नितीन काळे हे २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या वडिलांच्या घरासमोर असताना वरील चार जण तेथे आले. ‘तू शहनाज छगन काळे यांच्या खिशातील पैसे का काढून घेतले?’ असे म्हणत आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी गजाने डोक्यात मारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या हल्ल्यात नितीन काळे गंभीर जखमी झाले. तसेच ‘तुला येथे राहू देणार नाही,’ अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. घटनेनंतर जखमी नितीन काळे यांना उपचारासाठी जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, नितीन काळे यांच्या नातेवाईकांनी या घटनेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मारहाणीमुळे त्यांच्या नाकाचे हाड तुटले असून डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. नितीन काळे हे यापूर्वीपासूनच अपंग असल्याचेही नातेवाईकांनी सांगितले. उपचारासाठी आर्थिक परिस्थिती अडचणीची असल्याने कुटुंबीयांवर मोठा आर्थिक भार पडला आहे.

या पार्श्वभूमीवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कायद्यानुसार कठोर आणि लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. टी. बी. सोनवणे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!