पैसे मिळवणे हे आयुष्याचे ध्येय नाही, कलासाधना हेच ध्येय!’ — प्रमोद कांबळे जामखेडमध्ये मुकुंद राऊत व दीपक तुपेरे यांना ‘कलाभूषण पुरस्कार’, कला शिक्षक संघटनेचा स्तुत्य उपक्रम
‘पैसे मिळवणे हे आयुष्याचे ध्येय नाही, कलासाधना हेच ध्येय!’ — प्रमोद कांबळे
जामखेडमध्ये मुकुंद राऊत व दीपक तुपेरे यांना ‘कलाभूषण पुरस्कार’, कला शिक्षक संघटनेचा स्तुत्य उपक्रम
“पैसे मिळवणे हे आयुष्याचे ध्येय न ठेवता रोज कलासाधना आणि रियाज करणे महत्त्वाचे आहे. कलाकृती अजरामर असते आणि त्यामुळे कलाकाराची ओळख कायम राहते,” असा प्रेरणादायी संदेश प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी दिला.
प्रमोद कांबळे यांनी आपल्या मनोगतात कलासाधनेचा प्रवास उलगडताना उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला. “आजारी असतानाही मी या कार्यक्रमाला आलो आहे. रात्रभर जागून परदेशात चित्र देण्याचे काम केले आणि त्यानंतर जामखेडला आलो. माझ्या घरातील संपूर्ण वातावरणच कलात्मक आहे. बाहेरच्या जगात नोकरीच्या संधी मिळत होत्या; मात्र मी नोकरी केली नाही. पैसे मिळवणे हे आयुष्याचे ध्येय न ठेवता रोज कलासाधना आणि रियाज करतो,” असे त्यांनी सांगितले. जामखेड कला संघटनेने सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले याबद्दल जामखेड टीमचे कौतुक केले
जामखेड तालुका कलाध्यापक संघटना तालुकाध्यक्ष मयुर भोसले यांनी अहिल्यानगर कलाध्यापक व जामखेड कलाध्यापक संघटना संयुक्त विद्यमाने यंदापासून सुरू करण्यात आलेल्या ‘कलाभूषण पुरस्कार’ योजनेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे मुकुंद राऊत व दीपक तुपेरे यांना मान्यवरांच्या हस्ते ‘कलाभूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, पुरस्काराची रक्कमही संस्थेला देण्याची भावना या दोन्ही पुरस्कारार्थींनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार प्रमोद कांबळे, गटशिक्षणाधिकारी धनंजय बोंदार्डे, शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे, हाळपावत मामा, कलाध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पठाडे, दशरथ कोपनर, आप्पा शिरसाट, प्राचार्य दत्तात्रय राजमाने, मुख्याध्यापीका रोहिणी भोर, मुख्याध्यापक भरत लहाने, पी. एल. आवारे, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, पी. टी. गायकवाड, उपप्राचार्य युवराज भोसले, मीना राळेभात, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट, सचिव संतोष पवार, कुंडल राळेभात, मोहन यादव, सुग्रीव वायकर, रमेश चांदेकर, योगेश अब्दुले, बापुराव बांडराव, पोटे सर, संगिता दराडे, त्रिंबक लोळगे, संतोष सरसमकर, डाडर सर, अशोक बोराडे, वस्तारे सर, अरुण हेंद्रे, गर्जे सर, शेख सर, सुरज डाडर, सुनील भाबुंद्रे, बाळासाहेब धनवडे, मोरे सर, फुले सर, अंकुश गवळी, आबा जायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी होणार ‘कलाभूषण पुरस्कार’
कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना जामखेड तालुका कलाध्यापक संघटनेचे तालुकाध्यक्ष मयूर भोसले यांनी सांगितले की, यापुढे दरवर्षी कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांना ‘कलाभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे कला क्षेत्रातील गुणवंत, सर्जनशील आणि उपक्रमशील व्यक्तींना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुकुंद राऊत यांची कलेसोबत सामाजिक बांधिलकी चित्रकार मुकुंद राऊत हे पुणे येथे चित्रकला प्रदर्शने भरवितात. विशेष म्हणजे, या प्रदर्शनातून मिळणारी चित्रविक्रीची रक्कम ते नाम फाउंडेशनकडे सामाजिक कार्यासाठी प्रदान करतात. कलेची साधना करतानाच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यंदाचा ‘कलाभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना मुकुंद राऊत यांनी पुरस्काराबद्दल सांगितले की मी हा पुरस्कार दि पिपल्स एज्युकेशन संस्थेस समर्पित करतो.
दीपक तुपेरे यांचा सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय सहभाग दीपक तुपेरे हे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असून नाट्य स्पर्धांचे आयोजन तसेच सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यासाठी कार्यरत आहेत. कला, संस्कृती आणि सामाजिक उपक्रमांची सांगड घालत त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांचा ‘कलाभूषण पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. अनंता खेत्रे यांनी शुभेच्छा दिल्या.
‘कला आणि क्रीडा समाजाच्या जडणघडणीसाठी महत्त्वाचे’ — शिवाजीराव ढाळे शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे यांनी कला आणि क्रीडा या दोन्ही विषयांचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील महत्त्व अधोरेखित केले. कला ही केवळ मनोरंजनाची बाब नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात तिची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेत कला आणि क्रीडा विषयांना योग्य स्थान मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
‘जामखेडची कला शिक्षकांची टीम उपक्रमशील’ — संजय पठाडे
कलाध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पठाडे यांनी जामखेड तालुक्यातील कला शिक्षकांच्या उपक्रमशील कार्याचे कौतुक केले. “जामखेडची कला शिक्षकांची टीम खूप चांगली आणि उपक्रमशील आहे. ए.एम. उत्तीर्ण शिक्षकांना फरक मिळणारा अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कांबळे म्हणाले की, “कलाकृती अजरामर असते आणि त्यामुळे आपली ओळख कायम राहते. कलासाधनेसाठी मुंबई सोडून अहिल्यानगरला आलो. आपले कामच आपली जाहिरात करते. नगर-जामखेड परिसरात मैलाचे दगड ठरणारे काम करण्याची संधी मला मिळाली. प्रत्येकाने आपल्या आयुष्याचे ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे आहे. शाळांमध्ये कलाशिक्षकांची खरी गरज आहे,” असेही कांबळे यांनी नमूद केले.
‘कलेचा संबंध सर्व विषयांशी; तरीही शासनाकडून दुर्लक्ष’ — धनंजय बोंदार्डे
गटशिक्षणाधिकारी धनंजय बोंदार्डे यांनी कलेचा शिक्षणातील व्यापक संबंध स्पष्ट केला. “कलेचा संबंध सर्व विषयांशी आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कलेचे महत्त्व असतानाही शासनाकडून या विषयाकडे दुर्लक्ष होत आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. बी. जगदाळे व सुप्रिया घायतडक यांनी केले, तर संगिता दराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.