Thursday, October 1, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडकरांसाठी मोठी बातमी! दुष्काळाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी उजनीचे अतिरिक्त पाणी देणार –...

जामखेडकरांसाठी मोठी बातमी! दुष्काळाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी उजनीचे अतिरिक्त पाणी देणार – मंत्री विखे पाटील ‘राम शिंदे नाराज नाहीत’ – विखे पाटलांचा दावा

0
2
जामखेडकरांसाठी मोठी बातमी! दुष्काळाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी उजनीचे अतिरिक्त पाणी देणार – मंत्री विखे पाटील  ‘राम शिंदे नाराज नाहीत’ – विखे पाटलांचा दावा

जामखेड न्युज – – – – – 

जामखेडकरांसाठी मोठी बातमी! दुष्काळाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी उजनीचे अतिरिक्त पाणी देणार – मंत्री विखे पाटील

‘राम शिंदे नाराज नाहीत’ – विखे पाटलांचा दावा

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती गंभीर होत असताना जामखेड येथे गुरुवारी दुष्काळ व चारा-पाणी टंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सर्वाधिक गंभीर असल्याचे अधोरेखित करत जामखेडसाठी उजनी धरणातील अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून त्याचा प्राधान्याने पिण्यासाठी वापर करावा, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. “पुढील आठ महिने संवेदनशील राहून काम करावे लागेल,” असे सांगत विखे पाटील यांनी पाणीटंचाईकडे गांभीर्याने पाहण्याचे निर्देश दिले.

जामखेड तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता पाणीसाठ्याचे नियोजन, टँकरद्वारे पाणीपुरवठा, तसेच रखडलेल्या व अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. पिण्याच्या पाण्यासाठी पाणी शंभर टक्के आरक्षित ठेवण्यात आले असून, उपलब्ध स्रोतांचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे निर्देश देण्यात आले.

दरम्यान, जल जीवन मिशनच्या कामांमध्ये काही अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाल्याचेही विखे पाटील यांनी नमूद केले. अपूर्ण योजना तातडीने पूर्ण करण्याबरोबरच ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे, तेथे आगाऊ नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखे-राम शिंदे प्रथमच आमनेसामने
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच या बैठकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, या उद्देशाने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर येथे सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना निमंत्रण न दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

त्याच पार्श्वभूमीवर प्रा. राम शिंदे यांनी जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही घेतला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, या पार्श्वभूमीवर नाराजीच्या चर्चेनंतर जामखेड येथील दुष्काळ आढावा बैठकीत जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे दोघेही प्रथमच एका बैठकीत एकत्र दिसले. त्यामुळे बैठकीतील प्रशासकीय विषयांसोबतच जिल्हा बँक निवडणुकीच्या राजकीय घडामोडींचीही चर्चा रंगली.

‘राम शिंदे नाराज नाहीत’ – विखे पाटलांचा दावा
या संपूर्ण घडामोडींवर प्रतिक्रिया देताना डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी “मी राम शिंदे यांच्याशी बोललो असून त्यांची कुठलीही नाराजी नाही,” असा दावा केला.

संगमनेर येथे झालेल्या बैठकीत नेमके काय निर्णय झाले, याची आपल्याला पूर्ण माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज भरणे आणि त्यानंतरची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा सर्वजण एकत्र बसून चर्चा करतील, असे विखे पाटील यांनी सांगितले.

त्यामुळे एकीकडे जामखेड तालुक्यातील पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान असताना, दुसरीकडे जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, उजनीच्या अतिरिक्त पाण्यासाठी प्रयत्न आणि पुढील आठ महिन्यांचे नियोजन या बैठकीतील प्रमुख बाबी ठरल्या असून, आता प्रशासन या सूचनांची अंमलबजावणी कितपत वेगाने करते, याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!