जामखेड न्युज – – –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सुरु झालेला राणे विरुद्ध शिवसेना संघर्ष चिघळत चालला आहे. सध्या शिवसेना आणि भाजपामध्ये शाब्दीक द्वंद रंगले आहे. पण या शाब्दीक लढाईचे पर्यावसन हाणामारीत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर स्थगित झालेली जनआशीर्वाद यात्रा उद्यापासून पुन्हा सुरु होणार आहे. नारायण राणे रत्नागिरीमध्ये असताना पोलिसांनी कारवाई प्रक्रिया सुरु केल्यानंतर यात्रा स्थगित करण्यात आली होती.
पण आता उद्यापासून ही यात्रा पुन्हा सुरु करणार असल्याचे राणेंनी स्पष्ट केलेय. त्यामुळे कणकवलीत मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कणकवली शहर आणि परिसरामध्ये पोलिसांनी आज लाँगमार्च काढला होता. तालुक्याच्या मुख्य बाजारपेठा आणि संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिस कुमक वाढविण्यात आली आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने कालपासूनच जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे. मुख्य रस्त्यावर, बाजारपेठेत आणि चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त दिसत आहे. पोलिसांसोबत दंगल नियंत्रण पथकही सिंधुदुर्गात आले आहे. कणकवलीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, हा संदेश देण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
भाजपाची जन आशीर्वाद यात्रा जिल्ह्याच्या कोणत्या भागामध्ये निघणार आहे आणि त्यांना जिल्हा पोलिस प्रशासन परवानगी देणार का याबाबतही उत्सुकता आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांच्या येथील निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांची सध्या बैठक सुरू आहे. त्या बैठकीला भाजपचे नेते माजी आमदार प्रमोद जठार भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आमदार नितेश राणे आदींसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. नारायण राणे यांचा कणकवलीत बंगला आहे. आमदार वैभव नाईक कुडाळ-मालवणमधून निवडून आले असले, तरी ते स्वत: कणकवलीत राहतात. भाजपाचे प्रमोद जठार आणि राणेंचे कट्टर विरोधक संदेश पारकरही कणकवलीतच घर आहे.
सध्या सिंधुदुर्गात फक्त कणकवलीची जागा भाजपाकडे आहे. इथून राणेंचे सुपूत्र नितेश राणे आमदार आहेत. राणेंची राजकीय ताकद कमी झाली असली, तरी राणे समर्थक इथे मोठ्या संख्येने आहेत. त्याशिवाय सिंधुदुर्गादून शिवसेनेचे आमदार-खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे इथे कुठलाही राडा होऊ नये, यासाठी कणकवलीत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नारायण राणे आधी रत्नागिरीत अपूर्ण राहिलेला यात्रेचा टप्पा पूर्ण करतील. त्यानंतर शनिवारी सिंधुदुर्गात येण्याची शक्यता आहे.






