सुनील कोठारी, इस्माईल सय्यद अन् प्रकाश काळे यांची स्थानिक सल्लागार-समन्वय समितीवर निवड, जामखेडमध्ये अभिनंदनाचा वर्षाव!
रयत शिक्षण संस्थेच्या जामखेड शहरातील श्री नागेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार / समन्वय समितीवर सुनीलशेठ कोठारी, माजी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल सय्यद आणि प्रकाश काळे यांची सन २०२६-२७ ते सन २०२८-२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे. या तिन्ही निवडीमुळे विद्यालयाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, निवडीबद्दल जामखेड शहर व तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास, विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम, शाळेच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि विद्यालयाच्या प्रगतीसाठी स्थानिक सल्लागार-समन्वय समितीची भूमिका महत्त्वाची मानली जाते. या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील अनुभव असलेल्या तिन्ही सदस्यांची निवड झाल्याने विद्यालयाला त्यांच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा आणि मौलिक सल्ल्याचा लाभ होणार आहे.
सुनीलशेठ कोठारी यांच्या अनुभवाची विद्यालयाला साथ
जामखेडचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ पत्रकार सुनीलशेठ कोठारी यांची श्री नागेश विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समन्वय समिती सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सरपंचपदाच्या कार्यकाळातील प्रशासकीय अनुभव तसेच दीर्घकाळ पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य त्यांनी केले आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
शैक्षणिक, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील त्यांचा अनुभव विद्यालयाच्या आगामी वाटचालीसाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. निवडीनंतर बोलताना सुनीलशेठ कोठारी यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी समितीच्या माध्यमातून योगदान देण्याची भूमिका व्यक्त केली.
इस्माईल सय्यद यांचीही समितीवर निवड
माजी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल सय्यद यांचीही श्री नागेश विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार / समन्वय समितीवर तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. के. मडके यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा विद्यालयाच्या विकासासाठी उपयोग होईल, असा विश्वास निवडपत्रातून व्यक्त करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रमांना चालना देण्याच्या दृष्टीने समितीच्या माध्यमातून योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
प्रकाश काळे यांच्यावरही महत्त्वाची जबाबदारी
प्रकाश काळे यांचीही सन २०२६-२७ ते सन २०२८-२९ या कालावधीसाठी स्थानिक सल्लागार / समन्वय समितीवर निवड झाली आहे. विद्यालयाच्या शैक्षणिक, सामाजिक तसेच सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करणे, विविध उपक्रमांना चालना देणे तसेच विद्यालयाच्या विकासकामांना बळकटी देण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. प्रकाश काळे यांच्या निवडीमुळे विद्यालयाच्या प्रगतीला आणखी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
तिन्ही निवडीचे सर्व स्तरातून स्वागत सुनीलशेठ कोठारी, इस्माईल सय्यद आणि प्रकाश काळे यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, पालक, शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार, उत्तर विभाग सल्लागार व स्कूल कमिटी सदस्य राजेंद्र कोठारी, विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच जामखेड पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. नवीन समितीच्या माध्यमातून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला आणि विविध विकासकामांना अधिक बळ मिळावे, अशी अपेक्षा पालक व शिक्षणप्रेमींमधून व्यक्त होत आहे.