Sunday, September 13, 2026
Home क्राईम न्यूज खर्डा येथील कोयत्याने वार करून केलेल्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून उघड, ...

खर्डा येथील कोयत्याने वार करून केलेल्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून उघड, चार आरोपी ताब्यात, तीन अल्पवयीन मुलांचा समावेश

0
2
खर्डा येथील कोयत्याने वार करून केलेल्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून उघड,  चार आरोपी ताब्यात, तीन अल्पवयीन मुलांचा समावेश

जामखेड न्युज – – – – – 

खर्डा येथील कोयत्याने वार करून केलेल्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून उघड,

चार आरोपी ताब्यात, तीन अल्पवयीन मुलांचा समावेश

 

 

जामखेड तालुक्यातील खर्डा येथिल जातेगाव फटा याठिकाणी कोयत्याने वार करून करण्यात आलेल्या निर्घृण खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका सज्ञान आरोपीसह तीन विधिसंघर्षग्रस्त (अल्पवयीन) बालकांना ताब्यात घेतले आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी तान्हाजी भास्कर बोराडे (रा. माळेवाडी, ता. भूम, जि. धाराशिव) हे खर्डा (ता. जामखेड) येथे असताना मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी इसमांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर त्यांच्या डोक्यात कोयत्याने गंभीर वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १५८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​खर्डा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या न उघडकीस आलेल्या गुन्ह्याची गंभीर दखल घेत अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार शाहीद शेख, अभिजीत अरकल, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल आजबे, अजिनाथ पाखरे, रमीजराजा अत्तार, अरूण मोरे, फुरकान शेख आणि प्रशांत राठोड यांच्या पथकाची स्थापना करून त्यांना तपासासाठी रवाना करण्यात आले.

​तपास पथकाने तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना १३ सप्टेंबर २०२६ रोजी हा गुन्हा प्रसाद अशोक अडगळे याने त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती समोर आली. तसेच यातील मुख्य आरोपी पुणे येथे असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच पथकाने पुणे शहरात शोध घेऊन एका विधिसंघर्षग्रस्त बालकास (वय १७, रा. भुम, जि. धाराशिव) ताब्यात घेतले.


​त्यानंतर गुन्ह्यातील इतर आरोपी राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तेथे धाड टाकून प्रसाद अशोक अडगळे (वय १८, रा. टाकळीमियाँ, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) याच्यासह आणखी दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना (वय १६, रा. कारखाना रोड, टाकळीमियाँ आणि वय १७, रा. टाकळीमियाँ) ताब्यात घेतले.

​ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व चारही आरोपींना (एक सज्ञान आरोपी व तीन अल्पवयीन बालके) पुढील तपासासाठी खर्डा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले असून खर्डा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ​ही धडक कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!