Home क्राईम न्यूज २५ वर्षांचा रस्त्याचा तिढा अखेर सुटला! बनकर वस्तीचा रस्ता प्रशासनाने खुला केला,...

२५ वर्षांचा रस्त्याचा तिढा अखेर सुटला! बनकर वस्तीचा रस्ता प्रशासनाने खुला केला, ३०० नागरिकांना मोठा दिलासा

0
3
२५ वर्षांचा रस्त्याचा तिढा अखेर सुटला! बनकर वस्तीचा रस्ता प्रशासनाने खुला केला, ३०० नागरिकांना मोठा दिलासा

जामखेड न्युज – – – – – – 

२५ वर्षांचा रस्त्याचा तिढा अखेर सुटला! बनकर वस्तीचा रस्ता प्रशासनाने खुला केला, ३०० नागरिकांना मोठा दिलासा

देवदैठण येथील बनकर वस्ती, गायकवाड वस्ती आणि भोरे वस्ती परिसरातील नागरिकांसाठी गेल्या तब्बल २५ वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. तहसीलदार, जामखेड यांच्या आदेशानुसार प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात प्रत्यक्ष रस्ता खुला करण्याची कार्यवाही सुरू केली. त्यामुळे तीनही वस्त्यांवरील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बनकर वस्ती येथील रस्त्याचा वाद मागील २५ वर्षांपासून प्रलंबित होता. रस्त्याअभावी परिसरातील सुमारे ३०० नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतीकामासाठी तसेच दैनंदिन वाहतुकीसाठी या रस्त्याचा वापर होत असल्याने रस्ता खुला करण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत होती.


.
या प्रश्नावर बनकर वस्ती, गायकवाड वस्ती आणि भोरे वस्ती येथील नागरिक व शेतकऱ्यांनी १३ व १४ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. प्रशासनाने रस्ता खुला करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले होते.

त्यानंतर तहसीलदार, जामखेड यांच्या आदेशानुसार ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रशासनाने रस्ता खुला करण्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली. वस्तीवरील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आणि पोलीस बंदोबस्तात रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत प्रशासनाच्या देखरेखीखाली रस्ता खुला करण्याचे काम करण्यात आले.

यावेळी मंडळ अधिकारी श्री. ए. एल. शिरसाठ, तलाठी माने मॅडम, पोलीस उपनिरीक्षक खेडकर साहेब, पोलीस हवालदार क्षीरसागर साहेब यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

मात्र, रस्ता खुला करण्याचे काम सुरू असतानाच सिव्हिल कोर्ट, कर्जत येथील स्थगिती आदेश प्रशासनाला प्राप्त झाला. न्यायालयीन आदेशाची माहिती मिळताच प्रशासनाने पुढील काम तातडीने थांबविले. सुरू असलेल्या कामाचा पंचनामा करण्यात आला आणि न्यायालयीन आदेशाचा सन्मान राखत पुढील कार्यवाही स्थगित करण्यात आली.
२५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नावर प्रशासनाने प्रत्यक्ष हस्तक्षेप करून कार्यवाही सुरू केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयीन स्थगितीमुळे पुढील काम थांबले असले तरी रस्ता खुला करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याने तीनही वस्त्यांतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, बनकर वस्ती, गायकवाड वस्ती आणि भोरे वस्तीवरील नागरिक व शेतकऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीबद्दल प्रशासनाचे आभार मानले.

चौकट
न्यायालयीन आदेशामुळे पुढील काम थांबविले
तहसीलदार, जामखेड यांच्या आदेशानुसार ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पोलीस बंदोबस्तात रस्ता खुला करण्याचे काम सुरू करण्यात आले. प्रशासनाच्या उपस्थितीत काम सुरू असतानाच सिव्हिल कोर्ट, कर्जत येथील स्थगिती आदेश प्राप्त झाला. त्यामुळे न्यायालयीन आदेशाचा सन्मान राखत सुरू असलेल्या कामाचा पंचनामा करण्यात आला आणि पुढील काम थांबविण्यात आले.
– श्री. ए. एल. शिरसाठ, मंडळ अधिकारी, साकत

चौकट
१३-१४ ऑगस्टच्या उपोषणानंतर प्रशासनाची कार्यवाही
बनकर वस्ती, गायकवाड वस्ती आणि भोरे वस्तीवरील नागरिक व शेतकऱ्यांनी रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी १३ व १४ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. प्रशासनाने रस्ता खुला करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी प्रशासनाच्या आदेशानुसार वस्तीवरील सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत रस्ता खुला करण्याची कार्यवाही करण्यात आली. याबद्दल तिन्ही वस्तीवरील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!