Monday, September 7, 2026
Home ताज्या बातम्या ३० वर्षांचा खंड संपला! जामखेडमध्ये पुन्हा दहीहंडीचा थरार, ‘मातोश्री लाल आखाड्या’ने पहिल्याच...

३० वर्षांचा खंड संपला! जामखेडमध्ये पुन्हा दहीहंडीचा थरार, ‘मातोश्री लाल आखाड्या’ने पहिल्याच प्रयत्नात फोडली हंडी पुढील वर्षी भव्य-दिव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करणार – प्रा. मधुकर राळेभात

0
2
३० वर्षांचा खंड संपला! जामखेडमध्ये पुन्हा दहीहंडीचा थरार, ‘मातोश्री लाल आखाड्या’ने पहिल्याच प्रयत्नात फोडली हंडी  पुढील वर्षी भव्य-दिव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करणार – प्रा. मधुकर राळेभात

जामखेड न्युज – – – – 

३० वर्षांचा खंड संपला! जामखेडमध्ये पुन्हा दहीहंडीचा थरार, ‘मातोश्री लाल आखाड्या’ने पहिल्याच प्रयत्नात फोडली हंडी

पुढील वर्षी भव्य-दिव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करणार – प्रा. मधुकर राळेभात

 

तब्बल तीस वर्षांपासून खंडित झालेली जामखेड शहरातील सार्वजनिक दहीहंडीची परंपरा पुन्हा एकदा उत्साहात सुरू करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पेठेतील शनि-मारुती मंदिरासमोर रविवारी (दि. ६ सप्टेंबर) आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला गोविंदा पथकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल तीन दशकांनंतर ही सांस्कृतिक परंपरा पुन्हा सुरू झाल्याने शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

शनि-मारुती मंदिर विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून तसेच प्रा. मधुकर (आबा) राळेभात मित्र मंडळाच्या वतीने या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवात सहभागी झालेल्या गोविंदा पथकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. यावेळी मातोश्री लाल आखाडा या गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात दहीहंडी फोडत ११ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या पथकाचा सन्मान करून पारितोषिकाची रक्कम प्रदान करण्यात आली.
यावेळी बोलताना दहीहंडी स्पर्धेचे आयोजक प्रा. मधुकर राळेभात म्हणाले, “तीस वर्षांपूर्वी बंद पडलेली जामखेड शहरातील दहीहंडीची परंपरा पुन्हा सुरू करून शहराचे सांस्कृतिक वैभव जपण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. यावर्षी मोठा प्रतिसाद मिळाला नसला तरी पुढील वर्षी शहरात भव्य-दिव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.”

ते पुढे म्हणाले की, अशा सांस्कृतिक स्पर्धांमुळे समाजातील एकोपा अधिक दृढ होतो. तरुणांना एकत्र येण्याची संधी मिळते आणि त्यांच्यामध्ये संघभावना, शिस्त तसेच राष्ट्रीय भावना निर्माण होण्यास मदत होते. पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेत शहर व परिसरातील गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमास नगरपरिषद बांधकाम समितीचे सभापती मोहन पवार, शनि-मारुती मंदिराचे विश्वस्त विनायक राऊत, नगरसेवक संजय काशीद यांच्यासह विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विनायक राऊत, मोहन पवार व संजय काशीद यांनी मनोगत व्यक्त करत दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

तीस वर्षांनंतर जामखेड शहरातील सार्वजनिक दहीहंडीची परंपरा पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गोविंदा पथकांचा जल्लोष, उपस्थित नागरिकांचा उत्साह आणि पारंपरिक वातावरणामुळे शनि-मारुती मंदिर परिसरात उत्सवाचे स्वरूप निर्माण झाले होते. खंडित झालेली सांस्कृतिक परंपरा पुन्हा सुरू करण्याच्या या उपक्रमाचे शहरवासीयांनी स्वागत केले असून, पुढील वर्षी दहीहंडी अधिक मोठ्या स्वरूपात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!