‘ज्ञानदानाच्या ३३ वर्षांच्या सेवेला मानाचा मुजरा!’ ल. ना. होशिंग विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न पी. टी. गायकवाड व ईश्वर कोळी यांचा सपत्नीक सेवापूर्ती सन्मान
‘ज्ञानदानाच्या ३३ वर्षांच्या सेवेला मानाचा मुजरा!’ ल. ना. होशिंग विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न
पी. टी. गायकवाड व ईश्वर कोळी यांचा सपत्नीक सेवापूर्ती सन्मान
ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड येथे शिक्षक दिन विविध उपक्रम, मनोगते आणि सत्कार सोहळ्याने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीत दीर्घकाळ योगदान देणारे माजी मुख्याध्यापक पी. टी. गायकवाड व ईश्वर कोळी यांच्या सेवापूर्तीबद्दल सपत्नीक सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बी. ए. पारखे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य अनंता खेत्रे, आश्रुबा फुंदे, जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम केळकर, प्राचार्य विकी घायतडक, दादाहरी ठाकरे, शहाजी वायकर, पी. टी. गायकवाड, ईश्वर कोळी, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अरुण हेंद्रे, पर्यवेक्षक सुदाम वराट, आजचे प्राचार्य कार्तिकी पोतदार, उपमुख्याध्यापक समृद्धी कुलकर्णी, पर्यवेक्षक दुर्गा सरडे यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या वतीने अजित कापसे व तनिष्का सदाफुले यांनी मनोगत व्यक्त करत शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. प्राचार्य कार्तिकी पोतदार यांनीही शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. प्रास्ताविक पर्यवेक्षक सुदाम वराट यांनी केले
अध्यापक मनोगत व्यक्त करताना स्वप्नाली घाडगे यांनी, “मनुष्य आयुष्यभर विद्यार्थी असतो. केवळ शिक्षण देणे नव्हे, तर माणूस घडवणे महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन केले.
स्वाती बांगर यांनी दिवसभरातील कार्यक्रमाचे कौतुक करत शिक्षक विद्यार्थ्यांच्या सहभागाचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी विविध मान्यवरांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. शहाजी वायकर, प्रा. विकी घायतडक, प्राचार्य डॉ. गौतम केळकर व अरुण हेंद्रे यांनी शिक्षकांच्या योगदानाचा गौरव केला.
‘१९९२ पासूनची सेवा कायम स्मरणात राहील’ – पी टी गायकवाड
सत्काराला उत्तर देताना पी. टी. गायकवाड यांनी संस्थेतील आपल्या प्रदीर्घ सेवेला उजाळा दिला. सन १९९२ मध्ये संस्थेत रुजू झाल्याचे सांगत त्यांनी इंग्रजी विषयाचे अध्यापन करताना संस्थेच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. “ही आदर्श संस्था असून संस्थेतील पदाधिकारी व कुटुंबातील सदस्याप्रमाणे सर्वजण काम करतात. संस्थेत केलेले काम कायमस्वरूपी स्मरणात राहील,” असे त्यांनी भावनिकपणे सांगितले.
ईश्वर कोळी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, “मी याच संस्थेचा विद्यार्थी होतो आणि याच संस्थेत नोकरी करण्याची संधी मिळाली. ज्या शिक्षकांकडून शिक्षण घेतले, त्यांच्याबरोबरच सहकारी म्हणून काम करण्याचे भाग्य लाभले. माझी ३३ वर्षांची यशस्वी सेवा पूर्ण झाली,” असे सांगत संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
‘शिक्षक दिन आणि सेवापूर्ती सोहळा म्हणजे दूध-शर्करा योग’माजी प्राचार्य अनंता खेत्रे
शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात सेवापूर्ती सोहळा होत असल्याने हा “दूध-शर्करा योग” असल्याचे सांगितले. शिक्षकांनी समाज आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत बजावलेल्या भूमिकेचा गौरव करत सेवानिवृत्त शिक्षकांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य बी. ए. पारखे यांनी शिक्षकाच्या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट केले. “शिक्षक म्हणजे शिकवणारा, क्षमा करणारा आणि करून घेणारा. राष्ट्रनिर्मितीमध्ये शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावत असतात,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा उल्लेख करताना प्राचार्य पारखे यांनी जामखेड तालुक्यात ‘ए प्लस’ दर्जा मिळवणारे हे एकमेव विद्यालय असून जिल्ह्यात सहाव्या क्रमांकावर असल्याचे सांगितले. संस्थेची प्रेरणा, शिक्षकांचे परिश्रम, विद्यार्थी व पालकांचा सहभाग यामुळे विद्यालयाची वाटचाल जोमाने सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घायतडक मॅडम, सुपेकर मॅडम, श्रावणी कुलकर्णी व सृष्टी बेलेकर यांनी केले. तर दुर्गा सरडे यांनी आभार मानले.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने ज्ञानदानाच्या प्रदीर्घ सेवेला सलाम करत दोन कर्तव्यनिष्ठ शिक्षकांचा सपत्नीक सन्मान झाल्याने कार्यक्रमाला भावनिक आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले. उपस्थित शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी सेवापूर्तीचा सन्मान सोहळा टाळ्यांच्या कडकडाटात गौरविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन घायतडक मॅडम, सुपेकर मॅडम, श्रावणी कुलकर्णी, श्रृष्टी बेलेकर तर आभार दुर्गा सरडे यांनी मानले