जामखेड न्युज – – –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अशोभनीय आणि समाजात तेढ पसरवणारे विधान केल्याच्या आरोपावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली. राणे यांना महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री जामीन मंजूर केला. मात्र, दिवसभर राणे यांच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. अनेक ठिकाणी शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याने राजकीय वातावरण तापले. दरम्यान आज शिवसेनेच्या मुखपत्रातून राणेंवर टीका करण्यात आली आहे.
नारायण राणे भोकं पडलेला फुगा
“नारायण राणे हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिड्या जलदगतीने चढता आल्यामुळेच. ही सर्व शिवसेना या चार अक्षरांची कमाई. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांचा लोकसभा व विधानसभा मिळून चार वेळा दणकून पराभव शिवसेनेने केला. त्यामुळे राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल. हा फुगा कितीही हवा भरून फुगवला तरी वर जाणार नाही, पण भाजपने सध्या हा भोकवाला फुगा फुगवून दाखविण्याचे ठरवले आहे. असं सामनाच्या अग्रलेखात लिहण्यात आलंय.
बेंडुकाचीही दिली उपमा
राणे यांना काही लोक ‘डराव डराव’ करणाऱया बेडकाचीही उपमा देतात. राणे हे बेडुक असतील किंवा भोकवाला फुगा, पण राणे कोण? हे त्यांनी स्वतःच जाहीर केले, ‘‘मी ‘नॉर्मल’ माणूस नाही,’’ असे त्यांनी जाहीर केले. मग ते ऍबनॉर्मल आहेत काय ते तपासावे लागेल,” असा टोला या लेखाच्या सुरुवातीलाच लगावण्यात आलाय.
‘शिवसेनेवर भुंकण्याचे जुनेच उद्योग’
शिवसेना सोडून २० वर्षांचा काळ उलटला तरी या महाशयांचे शिवसेनाद्वेषाचे तुणतुणे सुरूच आहे. या काळात त्यांनी सरडा लाजेल असे रंग बदलले. त्यांचे भांडवल एकच, ते म्हणजे शिवसेना व ठाकऱ्यांवर यथेच्छ चिखलफेक करणे. त्या चिखलफेकीचे ‘इनाम’ म्हणून महाशयांना सूक्ष्म उद्योगाचे मंत्रीपद भाजपने केंद्रात दिले आहे. ते खाते इतके सूक्ष्म आहे की, हाती लाल दिव्याच्या गाडीशिवाय काहीच लागलेले नाही. त्यामुळे शिवसेनेवर भुंकण्याचे जुनेच उद्योग त्यांनी सुरू ठेवले आहेत,” असा टोला लेखामधून लगावण्यात आलाय.
‘त्यांनीच भाजपला नागडे करून सोडले’
महाराष्ट्राची सत्ता हातून निसटल्यापासून भाजपावाल्यांची डोकी कामातून गेली आहेत. त्यांचे आकांडतांडव सुरूच आहे. त्या आकांडतांडवाकडे जनता लक्ष देत नसल्यामुळे ‘महात्मा’ नारोबांसारखे भाडोत्री लोक शिवसेनेवर सोडले जात आहेत. या भाडोत्रींनी भाजपलाच नागडे करून सोडले व आता तोंड लपवून फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे,” अशा शब्दांमध्ये भाजापावर टीकास्त्र सोडण्यात आलंय.
..तर देशद्रोहाच्या बाबतीत तुरुंगात डांबले असते’
“केंद्रीय मंत्री नारोबा राणे यांनी शपथग्रहण केल्यापासून जे दिवे पेटवले व अक्कल पाजळली त्यामुळे केंद्रीय सरकारची मान शरमेने खाली झुकली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मांडीस मांडी लावून बसणाऱ्या ‘महात्मा’ नारोबा राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची भाषा केली. राणे यांचा पूर्व इतिहास पाहता त्यांचे विधान मोदी-शहांनी गांभीर्याने घेतलेच पाहिजे. पंतप्रधानांच्या बाबतीत कुणी असे विधान केले असते तर त्यास देशद्रोहाच्या आरोपाखाली एव्हाना तुरुंगात डांबलेच असते. असंही सामनातून ठणकावून सांगण्यात आलंय.