पोलिस भरतीचे ठरले वेळापत्रक ! ‘या’ दिवशी लेखी परीक्षा

0
824
जामखेड न्युज – – – 
दोन वर्षांपासून रखडलेल्या साडेपाच हजार पोलिस पदांच्या भरतीला  अखेर मुहूर्त सापडला आहे. 3, 4, 5, 6, 8 आणि 9 सप्टेंबर रोजी परीक्षा होणार आहे. त्यानंतर गणेशोत्सव झाल्यावर उर्वरित परीक्षा पार पडणार आहेत. सुरवातीला लेखी परीक्षा होणार असून त्यानंतर मैदानी चाचणी होईल, अशी माहिती पोलिस महासंचालक कार्यालयाने दिली.
तत्कालीन फडणवीस सरकारने 72 हजार पदांची मेगाभरती जाहीर केली. मात्र, सरकार बदलले, तरीही मेगाभरती झालेली नाही. दरम्यान, राज्याची आर्थिक स्थिती विस्कटलेली असतानाही अत्यावश्‍यक विभागातील पदभरतीला वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार 2019 मधील प्रलंबित पोलिस भरतीला आता सुरवात झाली आहे. ऑक्‍टोबरपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करून नव्या पोलिस कर्मचाऱ्यांना नियुक्‍ती दिली जाणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये नव्या पदभरतीला सुरवात होईल. 2020 मधील सात हजार पोलिस पदांची बिंदुनामावली मंजूर करून घेण्यात आली आहे. आता 2021 मधील बिंदुनामावली मंजूर झाल्यानंतर एकूण 12 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, दरवर्षी पोलिस भरतीला उमेदवारांची मोठी संख्या असते. या पार्श्‍वभूमीवर आगामी काळात सर्वप्रथम मैदानी चाचणी आणि त्यात उत्तीर्ण झालेल्यांची लेखी परीक्षा घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. मात्र, सध्या त्याला उमेदवारांचा विशेषत: ग्रामीण भागातील तरुणांचा विरोध असल्याने तो निर्णय प्रलंबित असल्याचेही सांगण्यात आले.
राज्यातील साडेपाच हजार पोलिस भरतीची परीक्षा 3 सप्टेंबरपासून सुरू होईल. ऑक्‍टोबरअखेर परीक्षा पूर्ण होऊन नियुक्‍त्या देण्याचे नियोजन आहे. 2020 आणि 2021 मधील 12 हजार पदांची भरती करण्याच्या दृष्टीनेही नियोजन सुरू आहे. – संजीव कुमार, अप्पर महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई
2021 च्या रिक्‍त पदांना मंजुरी नाहीच राज्यातील अतिमहत्त्वाच्या, अत्यावश्‍यक विभागात पोलिस विभागाचा समावेश आहे. गृह, आरोग्य, मेडिकल विभागाच्या पदभरतीला यापूर्वीच वित्त विभागाने परवानगी दिली आहे. राज्याच्या पोलिस दलात हजारो पदे रिक्‍त असून त्याची माहिती महासंचालक कार्यालयाने संकलित केली आहे. दरम्यान, मागील दोन-तीन वर्षांत अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून कोरोनामुळे अनेकजण शहीद झाले आहेत. तरीही, पोलिस दलातील 2021 मधील रिक्‍त पदांना अजून मंजुरी मिळालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here