जामखेड न्युज – – – –
“कुठे छत्रपती संभाजी महाराज आणि कुठे नारायण राणे, काहीही बोलायचं”: अंजली दमानिया
मुंबई: केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी संगमेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. नारायण राणे यांना घेऊन संगमेश्वर पोलीस महाडला रवाना झाले आहेत. नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान, नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी राज्यभरात अनेकविध ठिकाणी आंदोलने, निदर्शने केली. यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप नेते आणि जनआशीर्वाद यात्रेचे कोकणातील समन्वयक प्रमोद जठार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांनाही संगमेश्वरमध्ये अटक झाल्याचे म्हटले होते. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली असून, कुठे छत्रपती संभाजी महाराज आणि कुठे नारायण राणे, काहीही बोलायचे, असे म्हटले आहे.
जनआशीर्वाद यात्रेचे परिवर्तन आता आंदोलनात झाल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत नारायण राणेंची सुटका होत नाही तोपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात भाजपा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. सरकारने एक लक्षात घ्यावे छत्रपती संभाजी महाराजांनासुद्धा याच संगमेश्वरात अटक झाली आणि औरंगजेबाचे सरकार संपले होते. त्यामुळे या सरकारचे थडगं या महाराष्ट्रात उभं केल्याशिवाय भाजपा राहणार नाही, असे प्रमोद जठार यांनी म्हटले होते. यावरून अंजली दमानिया यांनी ट्विट करत प्रमोद जठार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
कुठे छत्रपती संभाजी महाराज आणि कुठे नारायण राणे
नारायण राणेंच्या अटकेवर प्रमोद जठार म्हणाले “छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा संगमेश्वरला अटक झाली होती”? कुठे छत्रपती संभाजी महाराज आणि कुठे नारायण राणे…”, असा टोला दमानिया यांनी लगावला आहे. तसेच पुढे बोलताना दमानिया यांनी, “काहीही बोलायचं…. कहा राजा भोज और कहा गांगु तेली, असे ट्विट दमानिया यांनी केले आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानमधले तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील एवढी झुंडशाही हे महाराष्ट्र विकास आघाडीचे लोकं करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेचा आम्ही निषेध आणि धिक्कार करतो. राज्य सरकार आणि शिवसेनेला गर्भीत इशारा देऊ इच्छितो सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करू. नारायण राणेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत नक्कीच संयम ठेवायला पाहिजे. त्यामुळे संयमाची अपेक्षा पक्षाने स्पष्टपणे बोलून दाखवली. त्यानंतर सुद्धा झुंडशाही आम्ही राज्यामध्ये बघत आहोत. शिवसेनेने हा तमाशा बंद करावा. भाजप कार्यालयाजवळ हे तमाशे चालू झाले तर भाजपा महाराष्ट्रभर तांडव करेल आणि त्याची जवाबदारी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीची राहील, असा थेट इशारा आशिष शेलार यांनी दिला.